मुंबई – राज्यात कोरोना बाधितांचा आकडा ८ हजारांच्या वर पोहचला असून मृतांचा आकडा ३४२ इतका झाला आहे. या संकटकाळात सर्वांनी एकजुटीने येऊन कोरोनाशी लढायला हवं. ही राजकारणाची वेळ नाही असं वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करुन नाव न घेता भाजपा नेत्यांवर निशाणा साधत आहेत. रविवारीही मुख्यमंत्र्यांनी राजकारण न करण्याचं आवाहन केले त्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी खोचक सल्ला दिला आहे.
याबाबत आशिष शेलार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून महाराष्ट्राला संबोधन केले त्याचे स्वागत आहे. हे खरं आहे की राजकारणाची वेळ नाही, पण राजकारण करु नये, घाणेरडे राजकारण करु नये हा संदेश सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिला असता तर बरं झालं असतं असं त्यांनी म्हटलं आहे.
तर राज्यपाल महोदयांवर टीका करणे, वांद्रेची घटना घडल्यानंतर या राज्यातील युवा मंत्री आपल्या परिवारातील सदस्य टीका करतात तेव्हा हे उत्तर देणे अपेक्षित होतं. त्यामुळे कोरोना विषयात संपूर्ण महाराष्ट्र विरोधी पक्षासह तुमच्या सोबत आहे याबाबत आश्वस्त राहा असंही भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून घोषित करावं यासाठी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली आहे. मात्र अद्याप याबाबत राज्यपालांनी कोणतीही घोषणा न केल्याने काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन राजभवन कोणत्याही राजकारणाचा अड्डा बनू नये तसेच यावेळी रामपाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येत आहे असं सांगत राज्यपालांवर नाव न घेता टीका केली होती.
तर १४ एप्रिलनंतर मुंबईतील वांद्रे स्टेशन परिसरात हजारोंच्या संख्येने जमाव झाला होता. परराज्यातील हे मजुर आम्हाला पगार द्या नाहीतर आमच्या मुळगावी जाऊ द्या अशा घोषणा देत स्टेशन परिसरात जमला. या घटनेवरुन मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. वारंवार मुख्यमंत्र्यांनी या मजुरांना गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करावी अशी विनंती केली पण केंद्र सरकारने या दुर्लक्ष केलं. त्यामुळे वांद्रेतील घटनेला केंद्र सरकार जबाबदार असल्याचं सूचक विधान त्यांनी केले. त्यावरुन भाजपा नेत्यांनी राज्य सरकारकडून मजुरांना अन्नधान्याची व्यवस्था होत नाही असं सांगत राज्य सरकारवर खापर फोडले होते.