Join us

Coronavirus: खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला नियमभंग; गृहमंत्री कारवाई करणार का? भाजपानं लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 6:40 PM

या संदर्भात किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे

ठळक मुद्देकोरोनाबाधितांचे नाव उघड करु नये, शासनाचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले कोरोनाग्रस्त रुग्णांचे नावभाजपाने गृहमंत्र्यांना पत्र लिहून केली कारवाई करण्याची मागणी

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजारांच्या वर पोहचला आहे तर १९४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची नावे उघड करु नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला होता. काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलने कोरोना बाधित रुग्णांचे नाव घेतले त्यांच्यावर पोलीस करण्याचे आदेश देण्यात आले. मग खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या नियमाचा भंग केला असून त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, कोरोनाबाधितांचे नाव उघड करु नये यासाठी कायद्याने महाराष्ट्र शासनाने मनाई केली होती. या नियमांचे उल्लंघन झाल्याची काही उदाहरण त्यांनी गृहमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कोरोना पॉझिटिव्ह पत्रकाराचं नाव घेतलं होतं. त्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते मिलिंद पाटील यांनीही सोशल मीडियावर एका नेता कोरोनाग्रस्त असल्याचं म्हटलं होतं असं त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

इतकचं नाही तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:च्या फेसबुक पोस्टवर एका ६ महिन्याच्या मुलाचं नाव जाहिररित्या घेतले होते. याबाबत आपण अनेकदा सांगितले की, कोणत्याही प्रकारे कोरोनाग्रस्त रुग्णांचे नाव जाहिररित्या घेऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. या तीन उदाहरणामध्ये गृह खात्याने काय कारवाई केली याबाबत माहिती द्या अशी मागणी करत गृह विभाग कारवाई करणार आहे का त्याची स्पष्टता करावी असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात प्रशासनाने सांगितलं होतं की, कोरोनाग्रस्त रुग्णाची नावं जाहीर करु नये कारण त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाण्याची भीती आहे, ती काळजी माध्यमांनी घ्यावी, जे नाव उघड करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता..

राज्य सरकारच्या या भूमिकेवर मनसेने आक्षेप घेत कोरोनाग्रस्त रुग्ण गुन्हेगार किंवा आरोपी नाहीत, त्यांना एचआयव्हीसारखा आजार नाही. त्यांना कुणीही वाळीत टाकणार नाही. यातून समाज सकारात्मक भूमिका घेईल. ही नावे जाहीर केल्यास समाजात जनजागृती वाढेल. जी लोक अशा व्यक्तींच्या संपर्कात असतील ते जागरुक होतील असा विश्वास मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला होता.

 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसभाजपाकिरीट सोमय्या