मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील ४ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव कमी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले आहे. मात्र २० तारखेपासून यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे.
राज्यातील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी मेट्रो आणि कोस्टल रोडच्या कामाला सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या कोस्टल रोड आणि मेट्रोच्या कामावरुन भाजपा नेत्यांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केलं आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या आरेमधील कारशेड प्रकल्पावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
गेल्या १४४ दिवसांपासून आरेमधील मेट्रो कारशेडचं कामकाज स्थगित केल्यामुळे जवळपास १ हजार ४४० कोटींचे नुकसान झाले आहे त्याचसोबत मेट्रोच्या कामालाही यामुळे विलंब होणार आहे. त्यामुळे बालहट्ट आणि राजहट्ट सोडून आरेमधील कारशेड कामावरील स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.
आरे मेट्रो कारशेडसाठी रातोरात पोलिस बंदोबस्तात शेकडो झाडे तोडण्यात आली होती. या कारशेडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच स्थगिती दिली होती. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी विनाशकाले विपरित बुद्धी असे म्हणत टीका केली होती. महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठीही मी तेवढाच विचार करत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचं सांगितलं होतं.
या कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी ४ जणांची समिती मागील महिन्यात नेमण्यात आली होती. आरेमधूनमेट्रो कारशेड अन्य ठिकाणी नेता येईल का? याबाबत ही समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे.आरेमधील मेट्रो कारशेडचं कामकाज सुरु ठेऊन राज्य सरकारने आरे वसाहतीच्या अंतर्गत ज्या जागेवर हिरवा पट्टा आहे त्याला जंगल म्हणून संरक्षण करता येईल अशी शिफारस केली आहे. २०१५ मध्ये आरेमध्ये मेट्रो कारशेड आणण्याचा प्रस्ताव आला होता. त्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि मुंबई मेट्रो रेल अधिकाऱ्यांमध्ये अनेक वाद रंगले होते. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर 4 ऑक्टोबर 2019 रोजी एका रात्रीत मेट्रो कारशेडच्या ३३ हेक्टर जागेवरील 2,141 झाडे तोडण्यात आली. या कारशेडला मनसेनेही विरोध केला होता.