Coronavirus: 'मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग होणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 01:15 PM2020-04-14T13:15:46+5:302020-04-14T14:01:38+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज ३ मेपर्यत देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Coronavirus: BJP leader Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray mac | Coronavirus: 'मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग होणार नाही'

Coronavirus: 'मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग होणार नाही'

Next

मुंबई: कोरोना व्हायरस हे एक जागतिक संकट असून संपूर्ण जग या महामारीचा सामना करत आहे. महाराष्ट्रात तर हे एक युद्ध असल्याचं म्हटलं आहे. या युद्धाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. पंरतु कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढल्याने राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2455 वर पोहोचला असून मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज ३ मेपर्यत देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध निर्णय घेतले आहे. पंरतु राज्य सरकारकडून अजूनही आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, लॉकडाऊनच वाढवण्याची घोषणा केंद्र आणि राज्य सरकारकडून झालेली आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही पॅकेज किंवा आर्थिकस्वरुपाची मदत जाहीर करणार आहे की नाही असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी लोकांना धीर देण्यासाठी फेसबुकच्या माध्यमातून नेहमी तोंड दाखवून उपयोग नाही अशी टीका देखील निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यात ३० एप्रिलपर्यत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मेपर्यत लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली आहे. 

दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2455 वर पोहोचला आहे. सोमवारी एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 741 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे नवे 905 रुग्ण सापडले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 360 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1221 जण बरे झाले आहेत.

Web Title: Coronavirus: BJP leader Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.