मुंबई: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शनिवारी 52 वरून 64 वर गेली असून, मुंबई 11 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे. यावर कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणारी जागा अपुरी पडत असेल तर मला कधीही कळवा असं आवाहन भाजपाचे नेते निलेश राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केले आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांसाठी अपुरी जागा पडत असेल किंवा आयसोलेशन विभाग व इतर कोणत्याही वैद्यकीय मदतीसाठी जागेची गरज असल्यास अंधेरीमधील सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे सिंधुदुर्ग भवनमधील जागा आम्ही देण्यास तयार आहोत, त्यासाठी मला कधीही कळवा असं निलेश राणे यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. खासकरून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे 31 मार्चपर्यंत खासगी ऑफिस आणि दुकाने बंद राहणार आहे. मात्र, यादरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनता कर्फ्यूचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात मुंबई व काही शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावणार नाही. बहुतांश विमान उड्डाणे बंद असतील आणि परदेशांतून येणाऱ्या सर्व विमानांना भारतात उतरण्यास शनिवार मध्यरात्रीपासूनच बंदी घालण्यात आली आहे. शिवाय प्रवासी असतील, तरच एसटीच्या बसेस सोडण्यात येतील. कोरोना विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लोकांनी या कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.