मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात करण्यात आलेलं सेरो सर्वेक्षण आणि त्यातून समोर आलेले निष्कर्ष यावरून भाजपानं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला लक्ष्य केलं आहे. मुंबईतील सुमारे ४० टक्के लोकांना कोरोना होऊन ते स्वबळावर बरे झाले असतील, तर राज्य सरकारनं काय करून दाखवलं, असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी विचारला. मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत असल्याचं सेरो सर्वेक्षणातून समोर आलं आहे. त्यावरून भाजपानं सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि महापालिकेनं तीन प्रभागांमध्ये अँटीबॉडी टेस्ट केल्या. त्यानुसार, झोपडपट्टीतील ५७ टक्के तर, इमारतींमधील १६ टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचं समोर आलं. तर, एका खासगी लॅबच्या पाहणीनुसार आतापर्यंत २५ टक्के मुंबईकरांनी स्वबळावर कोरोनावर मात केली आहे. या आकडेवारीचा संदर्भ देत शेलारांनी राज्य सरकार आणि महापालिकेला लक्ष्य केलं आहे. ४० टक्के मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत १ लाख अँटीबॉडी चाचणी करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे. 'झोपडपट्टीत शौचालयांची स्वच्छता नसल्याने, इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी बंद केल्याने कोरोना वाढला. चाचण्यांची संख्या जेव्हा आवश्यक होती, तेव्हा वाढवली नाही. आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगताय..? यात तुम्ही काय करुन दाखवले? १ लाख अँटीबॉडी चाचण्या करा... सत्य समोर येईल,' असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.