मुंबई – राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय युद्ध रंगत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नाव न घेता विरोधकांनी राजकारण करु नये असा उपदेश देत आहेत. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. आशिष शेलार यांच्या पाठोपाठ आमदार अतुल भातखळकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी शालीतून जोडे मारण्याचा प्रकार बंद करावा असा टोला हाणला आहे.
याबाबत भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करु नये हा सल्ला पहिल्यांदा सामना संपादकांना द्यावा. ते राज्यपालांवर टीका करतात, विरोधी पक्षाच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळे स्वत:च्या घरात आधी काय जळतंय ते पाहा, शालजोडे मारण्यापेक्षा त्याचा विचार करा. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढते, मृतांची संख्या वाढतेय. त्यामुळे जनतेत जाऊन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला तर चांगले होईल, आपल्या सहकाऱ्याच्या नथीतून तीर मारावे हे उद्योग बंद करावेत. महाराष्ट्राच्या प्रशासनावर अधिक पकड बसवण्याचा प्रयत्न करावा असं म्हटलं आहे.
तसेच विरोधक राजकारण करत नाही तरी आम्ही मात्र रोज सामानातून शिमगा करणार, चिखलफेक करणार, कोरोनाची आकडेवारी आणि वाढता धोका वगळून सर्व विषयांवर बोलणार. साळसूदपणाचा आव आणून शहाजोग सल्ले ही देणार. जनता झापडबंद आहे असे मानून डोळे बंद करून दूध पिणार अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
तत्पूर्वी आशिष शेलार यांनीही ट्विट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून महाराष्ट्राला संबोधन केले त्याचे स्वागत आहे. हे खरं आहे की राजकारणाची वेळ नाही, पण राजकारण करु नये, घाणेरडे राजकारण करु नये हा संदेश सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिला असता तर बरं झालं असतं असं ते म्हणाले, त्याचसोबत राज्यपाल महोदयांवर टीका करणे, वांद्रेची घटना घडल्यानंतर या राज्यातील युवा मंत्री आपल्या परिवारातील सदस्य टीका करतात तेव्हा हे उत्तर देणे अपेक्षित होतं. त्यामुळे कोरोना विषयात संपूर्ण महाराष्ट्र विरोधी पक्षासह तुमच्या सोबत आहे याबाबत आश्वस्त राहा असंही भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं होतं.
अन्य बातम्या
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”
राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार?
जाणून घ्या, भारतात कोरोनाचा संसर्ग कधी संपुष्टात येणार?; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा मोठा दावा!
...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज
मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर 'जिवंत' झाली महिला; डॉक्टर अन् कुटुंबाला बसला जबर धक्का