Coronavirus: ‘मी तर फकीर, धमक्या कुणाला देता; भंडाऱ्याचे पालकमंत्री मग सांगलीत काय करता?’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 11:03 PM2020-04-13T23:03:26+5:302020-04-13T23:05:32+5:30

विश्वजीत कदम यांना पालकमंत्री पदावरुन हटवण्याची मागणी

Coronavirus: BJP MLA Chandrakant Patil Answer to Minister Vishwajeet Kadam pnm | Coronavirus: ‘मी तर फकीर, धमक्या कुणाला देता; भंडाऱ्याचे पालकमंत्री मग सांगलीत काय करता?’

Coronavirus: ‘मी तर फकीर, धमक्या कुणाला देता; भंडाऱ्याचे पालकमंत्री मग सांगलीत काय करता?’

Next
ठळक मुद्देसांगलीच्या पुराची चौकशी करण्याचा नैतिक अधिकार नाहीचंद्रकांत पाटील यांचा विश्वजीत कदम यांच्यावर आरोप भंडारा जिल्हा पालकमंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी

मुंबई - आपण एका गिरणी कामगाराचा मुलगा असून फकीर आहोत, काचेच्या घराच्या धमक्या कुणाला देता असं प्रत्युत्तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना सोमवारी दिले. कोरोनाच्या संकटकाळी भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कदम यांची त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली.

सांगली येथे बोलताना विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी  दुसऱ्यावर दगड मारु नये अशी टिप्पणी केली होती. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपण फकीर आहोत. आपल्यावर टीका टिप्पणी करण्यापूर्वी विश्वजीत कदम यांनी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी करावी. सांगलीत पूर आला त्यावेळी आपण काय केले असा सवाल विश्वजीत कदम यांनी केला होता. पण मुळात आता संपूर्ण देश आणि राज्य कोरोनाच्या महाभयानक स्थितीचा सामना करत असताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले विश्वजीत कदम सांगलीत काय करत आहेत, यांचे त्यांनी उत्तर द्यावे असा प्रतिसवाल चंद्रकांत पाटील यांनी विश्वजीत कदम यांना केला.

संकटकाळी भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन कदम यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. कोरोनाच्या साथीमध्ये भाजपा सत्तेत नसूनही जनतेच्या मदतीला धावून गेला आहे. पक्षातर्फे राज्यातील ४६ लाख लोकांच्या भोजन व्यवस्थेसह शिधा देण्यात आला आहे. अन्य मदतीची आकडेवारी मोठी आहे. अशा स्थितीत पालकमंत्र्यांच्या जबाबदारीनुसार भंडारा जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या विश्वजीत कदम यांना सांगलीच्या पुराची चौकशी करण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी हाणला.

दरम्यान, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला, त्यावेळी आम्ही काय‌ केले याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. पूराचा फटका बसलेल्या चार लाख ७० हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले व पंधरा दिवस त्यांच्या भोजनाची आणि निवाऱ्यांची व्यवस्था केली. त्या लोकांना रोज साठ रुपये निर्वाह भत्ताही दिला. आसरा घेतलेले लोक परत आपल्या घरी जाण्यास निघाले, त्यावेळी त्यांना भांडीकुंडी व कपड्यांसाठी १५ हजार रुपये दिले. तसेच सहा महिन्यांचे रेशनही दिले. दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

Web Title: Coronavirus: BJP MLA Chandrakant Patil Answer to Minister Vishwajeet Kadam pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.