मुंबई - कोरोनामुळं मुंबईची परिस्थिती भयंकर आहे, सध्या मुंबईत जो पोरखेळ सुरु आहे, एकाबाजूला पालिका आयुक्त जुलैपर्यंत मुंबईत कोरोना संपेल असं सांगतायेत, पण आज कोरोनाच्या नावावर जी कमाई, भ्रष्टाचार सुरु आहे याबाबत विचार करायला पाहिजे, केंद्र सरकारवर टीका करुन या गोष्टी थांबणार नाही अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर टीका केली आहे.
याबाबत नितेश राणेंनी म्हटलं आहे की, कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही, हेल्पलाईनवर कॉल केल्यावर बेड्सची स्थिती सांगितली जात नाही आणि दुसऱ्या बाजूला नेस्को, बीकेसी याठिकाणी हजारो बेड्स उपलब्ध केल्याचं सांगण्यात येते, मग हे बेड्स खरचं कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी आहेत का? कोणत्याही प्रकारचे टेंडर न देता ही कोविड सेंटर उभारली जात आहे, त्याठिकाणी फक्त बेड्स आहेत, बाकीच्या उपकरणांचे काय, डॉक्टर, नर्स या सुविधांचे काय? हे कोणाच्या सांगण्यावरुन होत आहे, मित्रपरिवाराला खुश करण्यासाठी कोविड सेंटर उभारली जात आहे, या लोकांची नावे विधानसभेत उघड करणार आहे. रात्री ८ नंतर ज्या लोकांसोबत बसता त्यांना खुश करण्यासाठी हे सुरु आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच ऑक्सिजन नसल्याने २२० लोकांचे प्राण गेले असताना आज एका बिल्डरला टेंडर न काढता ऑक्सिजन सिलेंडरचं काम एका बिल्डरला दिलं गेलं. बिल्डर घरं बांधणार की लोकांना ऑक्सिजन सिलेंडर देणार? टेंडर न काढता अनेक कामांचे वाटप केले जात आहे. पेग्विन आणले गेले तेव्हा त्यांना सांभाळण्याचं काम आदित्य ठाकरेंच्या मित्राला दिले गेले, त्याला कोणताही अनुभव नसताना काम मिळालं, फक्त मित्रमंडळींना खुश करण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळताय, इतकी वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता आहे, बॉडी बॅगमध्ये २०-२० टक्के कमिशन खाल्ल जातं असा आरोप नितेश राणेंनी शिवसेनेवर केला आहे.
त्यासोबत कोकणातील मुंबईतील व्यक्ती १२ मे पासून गायब आहे, त्याची बायको गर्भवती आहे, ती सिंधुदुर्गात राहते, त्याचा थांगपत्ता नाही, आम्ही काहीच बोलायचं नाही, आमचं कुटुंब, नागरिक यांची काय अवस्था आहे? सरकार लोकांचे प्राण वाचवेल याचा विश्वास लोकांना राहिला नाही, बीकेसीतील कोविड सेंटर पूर्णपणे भरलेले नसताना फेज १, फेज २ अशाप्रकारे टेंडर न काढता कोविड सेंटर उभारली गेली, प्रत्येक कोविड सेंटरला २७ कोटी रुपये खर्च होतो, या संकटातही तुम्ही भ्रष्टाचार करत आहात, कोविड रुग्णांच्या मृत्यूची संख्या लपवली जाते. मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम सुरु आहे, वडील-मुलगा इतकचं मर्यादित हे सरकार राहिले आहे, फक्त बॅनरबाजी केली जाते, पण मुंबईकरांच्या समाधानासाठी काय केलं? असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर नितेश राणेंनी निशाणा साधला आहे.
दरम्यान, कोरोना परिस्थिती सुधाराल ही अपेक्षाही नाही, ज्या मित्रपरिवारांच्या सांगण्यावरुन तुम्ही हे करताय, ही सगळी माहिती उपलब्ध झाली आहे, हे जेव्हा समोर येईल तेव्हा मुंबईच्या रस्त्यावरुन फिरणं कठीण होईल, येणाऱ्या अधिवेशनात ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची चिरफाड करणार असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. मुंबई सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या अन् चालते व्हा, ८० हजार कोटींचे डिपॉझिट फक्त मातोश्रीसाठी आहेत का? मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी हे पैसे का वापरले जात नाहीत. मुंबईकरांनी या सर्वांचे खरे चेहरे पाहावेत असंही नितेश राणे म्हणाले आहेत.