Coronavirus: ‘आदित्य ठाकरेंची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे’; भाजपा खासदाराचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 07:31 PM2020-04-16T19:31:04+5:302020-04-16T19:36:14+5:30
इतर राज्यांच्या तुलनेत वैद्यकीय उपचार आणि काळजी घेण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे.
मुंबई – राज्य सरकार कोरोनाशी लढण्यात ठरले पूर्ण अपयशी ठरलं आहे. सोशल मीडियावर घडवून आणले जाणारे कौतुक बोगस असून कौतुक करणारे तिघाडीतील पक्षांचेच लोक आहेत. एकमेकांना सांभाळून घेत अपयश लपवण्याचे काम चालले आहे अशा शब्दात भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आदित्य ठाकरेंची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे यासारखी झाली आहे. केंद्र सरकारवर टीका करण्याएवढे तुमचे पद तरी आहे का? सगळं काही केंद्र सरकारने करायला हवे, तर राज्य काय करणार? तुमचे रिसोर्सर्स वापरा! तुमची बुद्धिमत्ता वापरा! राज्य डबघाईला येऊ देऊ नका असा टोला त्यांनी मंत्री आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
तसेच इतर राज्यांच्या तुलनेत वैद्यकीय उपचार आणि काळजी घेण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. देशातील अर्धे रुग्ण आणि अर्धे मृत महाराष्ट्रात आहेत मग कशासाठी या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताय असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला. मजूर का परत जायला बघताहेत? इथे त्यांना कसल्या सोयीसुविधा, खायला अन्न मिळत नाहीय. राज्य सरकारच्या सगळ्या फसव्या घोषणा आहेत असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, सरकार अपयशी ठरत असेल राज्य लष्कर व निमलष्करी दलाच्या हातात सोपवणे हाच आता उपाय आहे. एवढे लोक रस्त्यावर उतरेपर्यंत राज्य सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? मजूर उद्वेगाने बाहेर पडले तिथून मुख्यमंत्री फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर राहतात. त्यांच्या घरासमोर गोरगरीब लोकांची ही दयनीय अवस्था असेल तर बाकी राज्याचे काय विचारता? सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पहावे रुग्णांची काय अवस्था आहे. कसले कोडकौतुक? असा घणाघात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या. मात्र महाराष्ट्र सरकार याबाबतीत कमी पडले. कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या भागात योग्य ते उपाय केले नाहीत असा आरोपही त्यांनी केला.