गृहमंत्री अनिल देशमुखांच्या 'त्या' पत्रावर भाजपाची शंका; खुलासा करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 02:01 PM2020-04-09T14:01:35+5:302020-04-09T14:04:52+5:30
पत्रावरुन महाराष्ट्र भाजपाने शंका उपस्थित करत गृहमंत्र्यांकडे खुलासा करण्याची मागणी केली आहे.
मुंबई – देशात कोरोना व्हायरसचं संकट उभं राहिलं असताना तबलिगी मरकज प्रकरणावरुन केंद्र सरकारवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात दिल्लीत झालेल्या मरकज येथील कार्यक्रमातील लोक देशातील विविध राज्यात गेल्याने कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. या लोकांना शोधून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.
अशातच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील तबलिगीच्या मरकजमधील आयोजनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का दिली? या मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव सर्व राज्यात झाला त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मध्यरात्रीनंतर २ वाजता या मरकजमध्ये का गेले होते? देशमुख यांनी बुधवारी एक पत्रक प्रसिद्धीला दिले, त्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित करीत मरकजबाबत केंद्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.
मात्र या पत्रावरुन महाराष्ट्र भाजपाने शंका उपस्थित करत गृहमंत्र्यांकडे खुलासा करण्याची मागणी केली आहे. भाजपानं म्हटलंय की, कालपासून समाज माध्यमांवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरहेडवर लिहिलेले एक पत्र फिरत आहे. सदर पत्राच्या सत्यतेबद्दल साशंकता असून त्यामुळे लोकांमधे संभ्रम निर्माण झालेला आहे. वृत्तपत्रे व प्रसार माध्यमांमधे काम करणाऱ्या काही मंडळींचा असा दावा आहे की हे पत्र गृहमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत त्यांना पाठवले गेले आहे तर काही प्रसार माध्यमे हे पत्र खोटे अथवा बनावट असल्याचा दावा करत आहेत असं त्यांनी सांगितले आहे.
गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांनी खुलासा करावा भाजपा मुख्य प्रवक्ते @Madhavbhandari_ यांची मागणी#MantriMastJantaTrastpic.twitter.com/zV3P1Jjv7s
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 9, 2020
त्यामुळे सर्वप्रथम हे पत्र खोटे असल्याचे भासते. त्यातील भाषा बघता ती सरकारी किंवा औपचारिक भाषा नसून अतिशय अनौपचारिक भाषेत ते लिहिले गेले आहे. ते कोणा प्रति लिहीले आहे किंवा प्रेस रिलीज असल्यास 'प्रसिद्धीसाठी' असेही त्यात लिहिण्यात आलेले नसल्याने ते पत्र नेमके काय आहे हे कळत नाही आणि त्यामुळे त्याबाबतचा संभ्रम अधिकच वाढत आहे. जर ते पत्र खोटे असेल तर हा एक गंभीर गुन्हा आहे आणि गुन्हा जर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीत घडत असेल तर ती अधिकच गंभीर बाब आहे असा आरोप भाजपाने केला आहे. दरम्यान, या विषयात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर खुलासा करावा. तसेच सदर पत्र खोटे असल्यास त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.