मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने दुसऱ्या लाटेचे संकट रोखण्यासाठी महापालिकेने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार दैनंदिन चाचण्यांची संख्या २५ हजारांवरुन टप्प्याटप्प्याने ५० हजारांवर नेण्यात येणार आहे. तर दररोज एक लाख याप्रमाणे ४५ दिवसांमध्ये ४५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी लस देणाऱ्या खासगी रुग्णालयांची संख्या ५९ वरुन ८० पर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (BMC action plan, tests and vaccination to prevent coronavirus crisis)
मुंबईत दररोज अडीच हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सर्व मुंबईकरांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे प्रमाण पालिका रुग्णालयांच्या तुलनेने अत्यल्प आहे. त्यामुळे खासगी व पालिका रुग्णालयांची आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष बैठक घेतली. यावेळी रुग्णालयांतील खाटांचे व्यवस्थापन तसेच लसीकरण यावर आयुक्तांनी सूचना केल्या.
खाजगी रुग्णालयांना सूचना...सद्यस्थितीत ५९ खासगी रुग्णालयांमध्ये दररोज केवळ चार हजार लोकांचे लसीकरण होते. प्रत्येक रुग्णालयाने दररोज किमान एक हजार पात्र नागरिकांचे लसीकरण करावे. त्यासाठी स्थानिक नगरसेवकांसह सामाजिक, सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी.
लसीकरणाचे जास्तीत जास्त बूथ करावेत. पुरेशी जागा, पिण्याचे पाणी, चहा-कॉफी, बैठक व्यवस्था असावी, पुरेसा कर्मचारी वर्ग असावा. पहिला व दुसरा डोस घेणाऱया नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष करावेत. जेणेकरुन लवकर लस देता येईल. गर्दी होणार नाही.
शक्यतो लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ असावी. शक्य असल्यास २४ तास लसीकरणाची सोय करावी.
लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांची संख्या सध्याच्या ५९ वरुन ८० पर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. ही मंजुरी मिळताच सर्व सरकारी व खासगी रुग्णालये मिळून दररोज किमान एक लाख नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात येईल.
ज्या लसीचा पहिला डोस घेतला असेल, त्याचाच दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्याप्रमाणे लस उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे.