मुंबई : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट दिसत असल्याने सोमवारपासून मुंबईतील काही नागरी सेवा-सुविधा, काही व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ७२१ बाधित क्षेत्रांत अद्यापही निर्बंध कायम आहेत. अशा हॉटस्पॉटवर नजर ठेवण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचा समावेश असलेले विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकामार्फत बाधित क्षेत्रांतील व्यवहारावर नियंत्रण ठेवणे, जनजागृती करणे तसेच नियमांचे मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.पालिकेने स्थापन केलेल्या विशेष पथकातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी बाधित क्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन आढावा घेणार आहेत. बाधित क्षेत्रांमध्ये सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी होण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी लोकांना घरपोच अत्यावश्यक सेवा सुविधा मिळव्यात यासाठी हे पथक समन्वय साधणार आहे. तसेच या भागात अग्निशमन दलाच्या साहाय्याने निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे.
CoronaVirus: मुंबईतील ७२१ बाधित क्षेत्रांवर पालिकेची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 2:31 AM