शेफाली परब - पडित मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोविड मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासंदर्भातील राज्य सरकारचा अध्यादेश काढून तीन आठवडे उलटले तरी अद्याप लाभार्थी पुढे आलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या वॉर्ड वॉर रूममार्फत कोविड मृतांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे. त्यात काहींचे संपर्क क्रमांकच उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील नोंदीनुसार त्यांचे पत्ते शोधत कर्मचारी दारोदार फिरत आहेत. ही यादी तयार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिल्याने या कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू आहे.
मुंबईतून काही मोजक्याच कुटुंबियांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे या योजनेचे उद्दिष्टच असफल होत असल्याने महापालिकेमार्फत आता मृतांच्या कुटुंबियांची यादी तयार करण्यात येत आहे.
पालिकेचा वॉर्ड वॉर रूम कर्मचारी दारोदारपालिका आणि खासगी रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या सर्व कोविड रुग्णांची नोंद महापालिकेकडे आहे. मात्र अनेकांनी आतापर्यंत ५० हजार रुपये मदत मिळविण्यासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे कोविड काळात प्रत्येक विभागस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या वॉर्ड रूममार्फत सर्व मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून मदतीसाठी अर्ज करण्यास सांगण्यात येत आहे. मात्र काहींचे पत्ते, तर काहींचा संपर्क क्रमांकच चुकीचा आहे.
कोविड मृतांच्या कुटुंबीयांकडून येणाऱ्या अर्जाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे महापालिका स्वतः वॉर्ड वॉर रूममार्फत त्यांच्याशी संपर्क साधत आहे.सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई पालिका