Join us

CoronaVirus: दोन्ही डोस घेतले... तरी तिसरी लाट बाधणार का?; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 9:26 AM

दोन्ही डोस खूप आधी घेतले असतील तर लसीमुळे शरीरात निर्माण झालेल्या अँटिबॉडीजचा प्रभाव क्षीण होत जातो. 

भारताचा लसीकरणाचा वेग आता वाढीस लागला आहे. आतापर्यंत ६२ कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असून त्यापैकी सुमारे १५ कोटी लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. मात्र, लसीच्या दोन मात्रांमधील अंतर पाहता संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाही कोरोनाची बाधा होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन्ही डोस घेतलेले तिसऱ्या लाटेत तरून जातील का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर...

दोन्ही डोस खूप आधी घेतले असतील तर लसीमुळे शरीरात निर्माण झालेल्या अँटिबॉडीजचा प्रभाव क्षीण होत जातो. देशात आतापर्यंत जेवढ्या लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे त्यातील १० टक्के लोकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने टोक गाठण्याच्या आधीच संपूर्ण लसीकरण  झाले आहे.  या लोकांना तिसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

लसीचा प्रभाव किती टिकतो?

 साधारणत: लसीच्या एका डोसचा प्रभाव ८ ते १० हा आठवड्यांपर्यंत टिकतो. त्याच्या आत दुसरा डोस घेतला तर हा प्रभाव आणखी वाढतो. याचाच अर्थ संपूर्ण लसीकरण केले असेल तर चार ते सहा महिन्यांपर्यंत लसीचा प्रभाव टिकून राहतो. नंतर मात्र तो क्षीण होत जातो. 

बूस्टर डोसचे काय?  

ज्या देशांमध्ये लसीकरण मोहीम खूप आधी सुरू झाली त्या देशांनी बूस्टर डोस मोहिमेला सुरुवात केली आहे.  भारतात तूर्त दिला जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. 

तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी काय?

लसीकरण पूर्ण झाले असलेल्यांनी आणि वय ५०हून अधिक असलेल्यांसह सर्वांनी कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्कचा नियमित वापर करावा.

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या