Join us

Coronavirus: Breaking - राज्यातील ११ हजार कैद्यांची सुटका होणार, गृहमंत्र्यांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 9:58 PM

देशात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात तर परिस्थिती फारच अवघड होताना दिसत आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. देशातील आणि राज्यीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार काही महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील जवळपास ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या कैद्यांची तपासणी करुन त्यांना मोकळा श्वास घेण्यास राज्य सरकार परवानगी देत आहे.  

देशात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात तर परिस्थिती फारच अवघड होताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली असून महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ५ वर गेला आहे. तर, कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 125 झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या दोषी किंवा खटला दाखल असलेल्या आरोपी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळ-जवळ ११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने  पॅरोल देण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पुढील आठवड्याभरात यावर कार्यवाही व्हावी, अशाही सूचना दिल्याचे देशमुख यांनी व्टिटद्वारे सांगितले आहे. 

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १२५ रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे आतापर्यंत ७१९ रुग्ण आढळले असून यातले ६२ रुग्ण आज आढळून आहेत. त्यामुळे देशात कोरोना वेगानं हातपाय पसरत असल्याचं दिसून येतंय. कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेतल्यास महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. केरळमधील १३७ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. 

दरम्यान, चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर इराण सरकारने जेलमधील जवळपास 70, 000 हजार कैद्यांची सुटका केली. याबाबतची माहिती येथील मिझान ज्युडिशियरी साइटवर देण्यात आली आहे. तसेच, या बातमीला इराणचे ज्युडिशियरी चीफ इब्राहिम रायसी यांनी दुजोरा दिला. त्याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सरकारनेही ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  

 

टॅग्स :अनिल देशमुखगृह मंत्रालयतुरुंगमुंबईकोरोना वायरस बातम्या