- सुभाष झानवी दिल्ली : गायक-संगीतकार अदनान सामी हा कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्यापासून थोडक्यात बचावला आहे. अदनानने सांगितले की, ‘मी स्पेन आणि जर्मनीला माझ्या सासुरवाडीला जाणार होतो. तथापि, दैवयोगाने अगदी शेवटच्या क्षणी आम्ही हा दौरा रद्द केला. दौरा रद्द झाला नसता, तर मी, माझी पत्नी आणि मुलगी आज विलगीकरणात असतो.अदनानने म्हटले की, हा देवाचाच संदेश आहे. तो सांगतोय की, ‘तुम्ही फार वेगात चालला आहात, जरा गती कमी करा.’अदनानने म्हटले की, गेल्या पाच वर्षांपासून मी जगभर कन्सर्टस् करीत आहे. या पार्श्वभूमीवर आता पत्नी रोया आणि मुलगी मेदिना यांच्यासोबत घरी राहणे आनंददायक आहे. प्रवासात त्या दोघी सोबत असतातच; पण घरी सोबत असणे वेगळाच अनुभव आहे.मला घरी पाहून माझी मुलगी काहीशी अचंबित आणि भावुक झालेली आहे. वास्तविक २४ तास तिच्यासोबत राहण्याची माझी इच्छा असते; पण आपली स्पेस कशी जपायची, हे तिला कळते. कधी कधी ती मला हाकलून लावते.अदनानने सांगितले की, सर्वच भारतीयांनी विशेषत: सेलिब्रिटींनी अशा संकट काळात योग्य उदाहरण घालून दिले पाहिजे. तुम्ही प्रवास करीत असाल, तर परत येताना भारतीय अधिकाऱ्यांना सूचित करा. परत आल्यानंतर कृपया पार्टी करू नका. देश ‘लॉकडाऊन’मध्ये असताना पार्ट्या करणे योग्य नाही.
Coronavirus : कोरोना संपर्कापासून थोडक्यात बचावला गायक अदनान सामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 05:05 IST