Join us

Coronavirus: परत जाण्यासाठी आधी महाराष्ट्र सरकारची एनओसी घेऊन या; कर्नाटकात १०० जण अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 8:17 AM

बंगळुरूमध्ये अडकलेल्यांपैकी एक असलेल्या आणि मुंबई महानगर प्रदेशातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने ‘लोकमत’शी संपर्क साधून सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे

मुंबई : लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील ठाणे, नवी मुंबई, यवतमाळ असे अनेक जिल्ह्यातील १००हून अधिक नागरिक बंगळुरूमध्ये अडकले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी कर्नाटक सरकारकडे ऑनलाइन अर्ज केला. मात्र, कर्नाटक सरकारने त्यांना यासाठीमहाराष्ट्र सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणण्यास सांगितले आहे. एनओसी कुठून आणायची? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

बंगळुरूमध्ये अडकलेल्यांपैकी एक असलेल्या आणि मुंबई महानगर प्रदेशातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने ‘लोकमत’शी संपर्क साधून सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, बंगळुरूमध्ये महाराष्ट्रातील किमान १००हून अधिक नागरिक अडकले आहेत. कर्नाटक पोलीस म्हणाले, तुम्ही महाराष्ट्र सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन या. त्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्ट परमिट मिळेल. दुसरीकडे कर्नाटकने सेवासिंधू नावाचे संकेतस्थळ यासाठी तयार केले. त्यावर आम्ही अर्ज केले. मात्र, २ मेनंतरकाहीही कार्यवाही झाली नाही. आता तर ते संकेतस्थळही बंद आहे. दोन महिने झाले, मी आणि माझ्यासारखे १०० हून अधिक जण येथे अडकलो आहोत. येथून सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.सरकारने मदत करावीयवतमाळ येथील एक महिला बंगळुरू येथे मुलाखतीसाठी गेली होती. चार ते पाच दिवसांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. त्यामुळे दहा महिन्यांच्या बाळासह ज्येष्ठ नागरिक असलेल्या आईला तिने सोबत घेतले. दरम्यान, लॉकडाउन सुरू झाले आणि ही महिला आपले बाळ आणि आईसह बंगळुरूमध्ये अडकली. तिने सांगितले की, पहिले दोन दिवस आम्ही हॉटेलमध्ये राहिलो. मात्र, हॉटेल खर्चिक असल्याने कमी भाड्यावर कुठे राहता येते का ते पाहिले. येथे अवस्था वाईट आहे. कर्नाटक सरकार, पोलीस काही मदत करत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आमची मदत करावी.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकर्नाटक