CoronaVirus News: "कोरोनाच्या काळात जैन मंदिरे खुली करण्यास परवानगी देऊ शकत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 04:01 AM2020-08-14T04:01:21+5:302020-08-14T04:02:27+5:30
राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्युषण साजरा करण्यासाठी शहरातील जैन मंदिरे भक्तांसाठी खुली करू शकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले. १५ ते २३ आॅगस्टदरम्यान मंदिरे उघडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढेल, असे राज्य सरकारने म्हटले.
पर्युषण काळात जैन मंदिरे खुली करण्याच्या विरोधात राज्य सरकार आहे. कारण त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो आणि जीवितहानी होण्याचा धोका आहे, असे सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्या. एस.जे. काथावाला व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाला सांगितले. आठ दिवसांच्या पर्युषणाच्या काळात मंदिरात जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी एका ट्रस्टने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. एका वेळी फक्त २० ते ३० लोक आत येतील, याची काळजी मंदिर ट्रस्ट घेतील, असे याचिकादारांचे वकील प्रकाश झा यांनी सांगितले. मात्र सद्य:स्थितीत आम्ही राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तर, कोरोना स्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत पुनर्विचार करू, असे राज्य सरकारने सांगितले. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत वाट पाहा, असे न्यायालयाने म्हटले.
शहरातील एकूण लोकसंख्येपैकी एक टक्का लोक जैन धर्मीय आहेत. पर्युषणाचा काळ अत्यंत शुभ असल्याने सवलत द्यावी, असे याचिकादारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर आम्हाला सर्व समुदायाची काळजी आहे. तुमच्या सुरक्षेची चिंता आहे, असे न्यायालयाने सांगितले.