मुंबई – राज्यात तसेच देशात कोरोनाचा धोका झपाट्याने वाढत असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही आस्थापने सुरु करण्याची परवानगी नाही. रेल्वे, विमान वाहतूक सेवा ठप्प आहे. मात्र सागरी वाहतूक अद्यापही सुरु असल्याचं मनसेने सांगितलं आहे.
यासाठी मनसेच्या नाविक सेना युनियनमार्फत केंद्र सरकारच्या जहाज आणि बंदरे विभागाला पत्र पाठवण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, नोवेल कोरोना व्हायरसने सागरी दळणवळणातदेखील प्रवेश केला आहे. दुबई येथील नौकेतल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने त्यांची आपत्कालीन सुटका करण्यात आली आहे. भारतात तर मोठी बंदरे आहेत. सागरी मार्गाने कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी भारतीय बंदरावर येणाऱ्या प्रत्येक नौकेतील कामगार, कर्मचारी-अधिकारी यांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी. त्यांना सक्तीने १४ दिवस क्वारंटाईन करण्यात यावं तसेच संबंध नौकेचे सॅनिटायझेशन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच आपल्या एका नजर चुकीमुळे समाजात कोरोनाचे वावटळ उठणे अहितकर ठरेल. बीपीटी अंतर्गत सर्व सागरी किनाऱ्यावरील जहाजे, हद्दीत उभी असणारी परदेशी जहाजे यावरील कामगारांची तातडीने तपासणी करण्यात यावी. त्यामुळे केंद्राची खबरदारी सागरी व्यवसायाला सुरक्षित ठेवू शकते असं या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, फ्रान्सच्या नौदलाची ‘चार्लस-डी-गॉल’ ही विमानवाहू आण्विक युद्धनौका अटलांटिक महासागरात तैनातीवर असताना तिच्यावरील १,०८१ नौसैनिक व अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनी संसदेत सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, युद्धनौकेस १० दिवस आधी परत आणण्यात आले. सर्व नौसैनिकांची व कर्मचाºयांची चाचणी घेतली गेली. संसर्ग झालेल्यांमध्ये ५६५ नौसेनिक असून त्यापैकी २४ जणांना इस्पितळात एकाला अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. इतरांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले.
भारतीय नौदलाच्या मुंबईतील एका तळावर २६ नौसैनिकांना व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या संपूर्ण नौदल आस्थापनात ‘लॉकडाउन’ करण्यात आले आहे. मात्र नौदलाच्या कोणत्याही युद्धनौकेवर किंवा पाणबुडीवर या साथीची कोणालाही लागण झालेली नाही, असे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोना सागरी मार्गाने प्रवेश करु शकतो अशी भीती मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे.