Join us

Coronavirus: लसीकरणानंतर काेराेना झाला, तरी तीव्रता कमीच; मृत्यूचे प्रमाणही नगण्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:53 AM

मुंबई पालिका क्षेत्रात चाचण्‍यांची संख्‍या ६० हजार प्रतिदिन होणार असून, लसीकरणाचा साठा लवकरात लवकर मिळवून लसीकरण वेगाने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

मुंबई : मुंबईतील सध्‍याची दैनंदिन काेराेना लसीकरण क्षमता सुमारे ४५ हजार इतकी असून, ती दररोज १ लाखावर नेण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. त्‍यासाठी आणखी खासगी रुग्‍णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी, म्‍हणून काम सुरू आहे. लसीकरणानंतर काेराेना झाला तरी त्याची तीव्रता खूप कमी असून, मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांनाे, घाबरू नका, काेराेना प्रतिबंधासाठी लस हाच उपाय असून, लसीकरण करून घ्या, असे आवाहन प्रशासनाकडूून करण्यात येत आहे. मुंबई पालिका क्षेत्रात चाचण्‍यांची संख्‍या ६० हजार प्रतिदिन होणार असून, लसीकरणाचा साठा लवकरात लवकर मिळवून लसीकरण वेगाने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

इक्बाल सिंह चहल म्हणाले; संसर्ग रोखण्‍यासाठी लस महत्त्वाची

काेराेना संसर्ग रोखण्‍यासाठी लस महत्त्वाची आहे. सर्व पात्र नागरिकांनी लस टोचून घ्‍यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त इक्बाल सिंह चहल यांनी केले. काेराेना उपचारांसाठी बेडची कमतरता नाही. आयसीयू बेड तसेच व्‍हेंटिलेटर्स उपलब्‍ध आहेत. आवश्‍यकतेनुसार बेड्स वाढविण्‍याची कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

लसींचा साठा मिळणार

लसीकरणासाठी नागरिक येत आहेत. लसींचा साठा काहीसा कमी आहे. लस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शनिवारी आपण महापालिकेच्या केंद्रालाच लस दिली आहे. खासगी केंद्र बंद आहेत. त्यामुळे लसीकरणास गर्दी होत आहे. आपल्याला लसींचा साठा मिळणार आहे. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणानंतर काेराेना झालाही असेल. त्याला इन्फेक्शन झाले असेल. लसीकरण केले की काेराेना होत नाही, असे नाही, ताे होऊ शकतो; पण त्याची तीव्रता खूपच कमी असते. मृत्यूचे प्रमाणही नगण्य असेल.- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी  आरोग्‍य अधिकारी, मुंबई महापालिका

नोंदणी नसेल तर...

कोविन ॲपवर लसीकरणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता, नजीकच्या रुग्णालयांमध्ये थेट जाऊन लस घ्यावी.  नोंदणी केली नसल्यास नजीकच्या रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी व तेथे लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.

लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा पार

२६ मार्च रोजी लसीकरणाच्या संख्येचा १० लाखांचा टप्पा पार झाला. तेव्हा एकूण १० लाख ८ हजार ३२३ इतके लसीकरण करण्यात आले. यापैकी ७ लाख ७ हजार ४७४ इतके म्हणजेच ७०.१६ टक्के लसीकरण हे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर करण्यात आले.

येथे मोफत लसीकरणपालिका, सरकारच्या अखत्यारितील केंद्रांवर मोफत लसीकरण केले जाते. खासगी लसीकरण केंद्रांवर शुल्क आकारण्यास मंजुरी आहे. सर्वाधिक लसीकरण पालिकेच्या केंद्रांवर होत आहे.

कोणाला  कधी लस?

१६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे लसीकरण सुरू१ फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणास सुरुवात१ मार्चपासून वयाची ६० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक, वयाची ४५ वर्षे पूर्ण होण्यासह सहव्याधी असलेले नागरिक यांच्या लसीकरणास प्रारंभ१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच मिळणार लस

दोन्ही लसी परिणामकारक

१६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली, तर १५ मार्चपासून भारत बायोटेक या कंपनीची कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली. दोन्ही लस मुंबईसह देशात वापरण्यात येत आहेत. लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसून, दोन्हीही लसी परिणामकारक आहेत. त्यामुळे लसींबाबत संभ्रम न बाळगता केंद्रावर जी लस उपलब्ध अ­सेल ती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लस