Coronavirus: कोरोनामुळे मरोळच्या सुक्या मासळी बाजारात शुकशुकाट; खवय्यांची गर्दी ओसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 01:53 AM2020-10-13T01:53:09+5:302020-10-13T01:53:38+5:30
मच्छीमारांवर उपासमारीची वेळ
मनोहर कुंभेजकर
मुंबई : सध्याची कोरोनाजन्य परिस्थिती बघता दर शनिवारी कोरोनापूर्वी गजबजलेला अंधेरी (पूर्व) मरोळ येथील महाराष्ट्रातील एकमेव सुका मासळी बाजार सध्या ओस पडला असून, बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या महिला ग्राहकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या फार कमी प्रमाणात कोळी महिला भगिनी बाजारात येत असून खवय्यांची गर्दी होत नाही. एकीकडे वाढती महागाई आणि कोरोना महामारीचे सावट अशा परिस्थितीत मरोळच्या सुक्या मासळी बाजारातील महिलांची बिकट अवस्था निर्माण होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मरोळच्या सुक्या मासळी बाजारातील सभासद भगिनींनी संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी यांची नुकतीच भेट घेतली. कोळी महिलांवर येणारी उपासमारीची वेळ हा विषय खूप गांभीर्याचा असून यासंदर्भात लवकरच मोठे पाऊल उचलण्यात येईल, असे आश्वासन संस्थेच्या महिलांना दिल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली. मरोळच्या सुक्या मासळी बाजाराची सुकी मासळी आवडीने खाणाºया खवय्यांची म्हणे रोजच जणू दिवाळी. दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या मरोळच्या सुकी मासळी बाजारातील हजारो कोळी महिलांचा उदरनिर्वाह सुकी मासळीविक्रीवरच अवलंबून आहे.
मुंबईच्या वर्सोवा, धोंडीपाडा, मढ, पातवाडी, भाटी गाव, मालवणी, मनोरी, गोराई, उत्तन, उत्तन डोंगरी चौक, वसई, अर्नाळा, टेंबीपाडा, आगाशी, सातपाटी अशा विविध कोळीवाड्यांमधून कोळी महिला सुकी मासळीची विक्री करून आपल्या परिवाराचे पोट भरतात, अशी माहिती राजेश्री भानजी यांनी शेवटी दिली.
परदेशातही आहे मागणी
महाराष्ट्रातच काय परदेशातसुद्धा जशी ओली मासळी खाल्ली जाते त्याचप्रमाणे सुकी मासळीसुद्धा मोठ्या प्रमाणात मत्स्यप्रेमी आवडीने खातात. दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या मरोळच्या सुकी मासळी बाजारातील हजारो कोळी महिलांचा उदरनिर्वाह सुकी मासळी विक्रीवरच अवलंबून आहे.