मुंबईः येस बँक, DHFL अशा घोटाळ्यांमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या अडचणी आणखी वाढ झाली आहे. लॉकडाऊन असतानाच वाधवान कुटुंबीयांतील २३ जणांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. त्याकरिता त्यांना व्हीआयपी पास मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या सर्व प्रकरणानंतर वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरच्या सेंट झेविअर्स शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं आहे.सीबीआयनं साताऱ्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि एसपी यांना एक पत्र लिहून कपिल वाधवन आणि धीरज वाधवन यांना क्वारंटाइनमधून मुक्तता न करण्याची विनंती केली आहे. तसेच सीबीआय कोर्टानं फसवणुकीच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. वाधवान कुटुंबियांचा हा सर्व प्रकार समोर आल्यांनतर अमिताभ गुप्ता यांच्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई केली आहे. परंतु या कारवाईनंतर देखील भाजपाने सरकारवर निशाणा साधला आहे.भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी तर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले आहे. शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून महाबळेश्वरला जाण्यासाठीचं परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचे सांगितले आहे. शरद पवारांचा या सर्व प्रकरणामध्ये हात असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आता शरद पवार याबाबत प्रत्युत्तर देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तत्पूर्वी अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हणाले की, वाधवान कुटुंबीयांना लॉकडाऊनमध्ये प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. कायदा सर्वांसाठी समान असल्याची माहिती देखील यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.कोणाच्या आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? : फडणवीसराज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र घेऊन वाधवान कुटुंब लॉकडाऊनमध्येही मुंबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर सरकारवर विशेषत: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात प्रश्न उपस्थित करत उत्तर देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात बलाढ्य आणि श्रीमंताना लॉकडाऊन नाही का? पोलिसांच्या अधिकृत परवानगीने काही जण महाबळेश्वरमध्ये सुट्टीला गेले आहेत. एवढ्या मोठ्या चुकीचे काय परिणाम होतील माहित असूनही वरिष्ठ आयपीएस अधिकारी असं कृत्य करेल, हे शक्य वाटत नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे घडलं? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्पष्टीकरणं देणं गरजेचं आहे असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.