coronavirus: कोरोनामुळे सोशल मीडियावर साजरी झाली गुरुपौर्णिमा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:00 AM2020-07-06T02:00:52+5:302020-07-06T02:01:22+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यावेळी विविध सण व उत्सव साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी मोठे उत्सव रद्द केले जात आहेत.
मुंबई : दरवर्षी उत्साहात साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. दरवर्षी परंपरेप्रमाणे शिष्य आपल्या गुरूंची पूजा करण्याकरिता व त्यांना वंदन करण्याकरिता विविध ठिकाणी जात असतात. यंदा लॉकडाऊनमुळे अनेक मंदिरे व मठ अद्यापही बंद ठेवण्यात आले आहेत. अनेकांनी यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरूंना वंदन केले. विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना फोन व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यावेळी विविध सण व उत्सव साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी मोठे उत्सव रद्द केले जात आहेत. मुंबईतील दादर येथील स्वामी समर्थ मठ, शिर्डी येथील साईबाबा मंदिर, शेगाव, अक्कलकोट, गगनगिरी मठ इत्यादी ठिकाणी दरवर्षी भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन करण्यासाठी गर्दी करतात. यंदा भाविकांविना या मंदिरांमध्ये शुकशुकाट पसरला होता. तरीही काही मंदिरांमधून भक्तांसाठी आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
भाविकांना घरबसल्या गुरुपौर्णिमेचा आनंद घेता आला. काही गुरूंनी आपल्या शिष्यांकरिता यूट्युब, फेसबुक तसेच झूम मीटिंगद्वारे आॅनलाइन प्रवचनाची व्यवस्था केली होती. शाळांमध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. आॅनलाइन शाळा भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत आॅनलाइन गुरुपौर्णिमा साजरी केली. अनेकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या आई-वडिलांची पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.