Coronavirus: केंद्राकडून झोन्सची यादी जाहीर; बघा तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 03:15 PM2020-05-01T15:15:21+5:302020-05-01T15:18:33+5:30
Coronavirus Latest News: उद्धव ठाकरे यांनी देखील आज जनतेशी संवाद साधताना रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनबाबत माहिती दिली.
मुंबई: ३ मे रोजी लॉकडाऊन लागू करून ४० दिवस पूर्ण होणार आहेत. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढतच चालले आहे. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल केल्यास कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणाची यादी देखील केंद्र सरकारकडून आता जाहीर करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज जनतेशी संवाद साधताना रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनबाबत माहिती दिली. ३ मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह इतर रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक दिली जाईल. मात्र घाई-गडबड करू नका, अन्यथा सर्व तपश्चर्या वाया जाईल असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
केंद्र सरकारने महराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये, १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर ६ जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये करण्यात आला आहे. रेड, ऑरेंज व ग्रीन झोन क्षेत्रात लॉकडाऊन संदर्भातील नियमावली येत्या ३ मे रोजी घोषित केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाहा तुमचा जिल्हा, कोणत्या झोनमध्ये-
रेड झोन- मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव
ऑरेंज झोन- रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड
ग्रीन झोन- उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, वर्धा, गोंदिया, गडचिरोली