Join us

Coronavirus: लॉकडाउनमध्ये मध्य रेल्वेने केले ३२३ पार्सल गाड्यांचे नियोजन; २३० गाड्या धावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 1:46 AM

३ हजार ४०० टन सामग्रीची वाहतूक

मुंबई : लॉकडाउन काळात मध्य रेल्वे प्रशासनाने पार्सल गाड्या चालविण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसºया लॉकडाउनमध्ये एकूण ३२३ पार्सल गाड्या चालविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी रेल्वेने वेळापत्रक तयार केले आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत २३० पार्सल गाड्या धावल्या असून यातून ३ हजार ४०० टन सामग्रीची वाहतूक केली आहे.जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सामग्री, शेतीतील माल वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मध्य रेल्वेची मालगाडी, पार्सल सेवा सुरू आहे. फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि बी-बियाणे यासह नाशिवंत वस्तूंसाठी रेल्वेने पार्सल स्पेशल ट्रेनचे मार्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार अन्नधान्य, पदार्थ पोहोचविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ, मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर विभागांतून मध्य रेल्वेने ३२३ पार्सल गाड्यांचे वेळापत्रक तयार केले आहे.

त्यापैकी २३० पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार धावल्या आहेत. आणखी ९३ गाड्या धावणार आहेत. २३० पार्सल गाड्यांमधून मध्य रेल्वेने ३ हजार ४०० टनहून अधिक पार्सलची वाहतूक लॉकडाउनदरम्यान केली. यामध्ये ४९८ टन औषध व वैद्यकीय उपकरणे, १ हजार ३९७ टन नाशिवंत वस्तू, ३४ टन टपाल बॅग आणि २९ टन ई-कॉमर्स वस्तूंचा समावेश होता. कोरोनाशी सामना करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात १७ मेपर्यंत म्हणजे आणखीन दोन आठवडे लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. प्रवासी रेल्वे सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र देशाच्या विविध भागांत आवश्यक पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मालगाडी आणि पार्सल गाड्यांची वाहतूक कायम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे.

टॅग्स :रेल्वे