मुंबई : मुंबई शहरात तब्बल ६५,५०० लोक होम क्वारंटाइन मध्ये आहेत. एकाच घरात पाच ते आठ लोक रहात असतील, तर तुम्ही त्यांच्याकडून स्वतंत्र राहण्याची अपेक्षा कशी करता, असा सवाल केंद्रीय पथकाने राज्य सरकारला केला आहे. त्यामुळे उद्यापासून या लोकांना रुग्णालयांमध्ये भरती करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला.महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून केंद्र सरकारने दोन पथके महाराष्ट्रात पाठवली आहेत. खाद्य प्रक्रिया उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांच्या नेतृत्वाखालील पथकात सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. एस. डी. खापर्डे, आरोग्य व कुटुंब नियोजन विभागाचे संचालक डॉ. नागेश कुमार सिंग, उपभोक्ता विभागाचे संचालक अभय कुमार व एनडीएमएचे सह सल्लागार अनुराग राणा यांचा समावेश आहे. या पथकाने बुधवारी मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी दिल्या. धारावीतील सोशल नगर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शाळा, तसेच सेव्हन हिल हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. कॉन्टॅक्ट ट्रेसींगविषयी माहिती घेतली. आरोग्य मंत्री राजेश टोपे त्यांच्या समवेत होते. केंद्रीय पथकाने जेथे कंटेन्मेट झोन आहे, त्या भागातील सोयीसुविधा, नागरिकांना कसे फूडपॅकेट पोहोचविले जाते याबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. मुंबईत छोट्या जागेत पाच दहा लोक रहात आहेत आणि त्या लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन करावे अशी अपेक्षा कशी धरता? असे पथकाने विचारले, त्यावर कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नव्हते. त्यामुळेच उद्यापासून ही मोहीम गतीने राबवली जाणार आहे. राज्यात किती लॅब सुरु झाल्या, किती तपासण्या झाल्या याची माहिती पथकाला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.पुण्यातही पाहाणीऊर्जा विभागाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील दुसºया पथकाने पुणे शहराचा आढावा घेतला. यात अतिरिक्त महासंचालक डॉ. पी. के. सेन, एनडीएमएचे सहाय्यक सल्लागार डॉ. पवन कुमार सिंग, आरोग्य व कुटुंब नियोजन विभाग उपसचिव डॉ. अश्विन गवई, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे संचालक करमवीर सिंग यांचा समावेश होता.
CoronaVirus: होम क्वारंटाइनच्या संख्येवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 3:52 AM