मुंबई – केंद्राने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर परराज्यातील मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. मुंब्रापाठोपाठ वांद्रे बस डेपो परिसरातील हजारोंच्या संख्येत रस्त्यावर जमाव उतरला होता. आम्हाला आमच्या मुळगावी जाऊ द्या अशी मागणी या मजुरांनी केली आहे. या जमलेल्या जमावामुळे परिसरात लॉकडाऊनची ऐशीतैशी झाल्याचं पाहायला मिळालं.
अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं. पोलिसांनी लाठीचार्ज सुरु करताच जमाव पळू लागला. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पण यावरुन राजकारण सुरु झालं आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावरुन केंद्र सरकारवर आरोप केला आहे.
वांद्रे येथे लॉकडाऊनची ऐशीतैशी; हजारोंच्या संख्येने उतरलेल्या जमावामुळे परिसरात तणाव
आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन म्हटलंय की, वांद्रे स्थानकातील सध्याची परिस्थिती किंवा सूरतमधील दंगल ही केंद्र सरकार स्थलांतरित कामगारांसाठी घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्याचा परिणाम आहे. त्यांना अन्न किंवा निवारा नको आहे, त्यांना घरी परत जायचे आहे. ज्या दिवशी गाड्या बंद केल्या आहेत त्या दिवसापासून, प्रवासी कामगार घरी परत जावेत यासाठी राज्याने २४ तासांसाठी गाड्या धावण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान-सीएम व्हिडीओ कॉन्फरन्समध्येही हा प्रश्न उपस्थित केला होता असं आदित्य यांनी सांगितले आहे
तर केंद्र शासनाने एक रोड मॅप तयार करुन परप्रांतीय कामगारांना एका राज्यातून दुसर्या राज्यात सुरक्षित आणि कार्यक्षमतेने पोहचवण्यास मदत करावी. हा मुद्दा केंद्राकडे वारंवार उपस्थित केला जात आहे. गुजरातमधील सुरतमध्ये कायदा व सुव्यवस्थेची अशीच परिस्थिती निर्माण झाली. सर्व स्थलांतरित कामगार कॅम्पमध्ये जेवण आणि राहणे पसंत करत नसून त्यांना घरी परत जायचं आहे. सध्या महाराष्ट्रात विविध निवारा केंद्रात ६ लाखांहून अधिक लोक वास्तव्यास आहेत असं आदित्य ठाकरेंनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनदरम्यान सुरतमध्येही हाती काम नसल्यामुळे मजुरांनी दोन ठिकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली होती. सूरत येथील डायमंड बुर्समध्ये बांधकाम मजूर आणि लसकाणामध्ये सूतगिरणी कामगार रस्त्यावर उतरले. लॉकडाऊन सुरु राहिले, तर राहायचे कसे, असा सवाल करत एकतर काम सुरु करा किंवा घरी तरी जाऊ द्या, अशी मागणी या कामगारांनी केली. यावेळी सूतगिरणी कामगारांनी भाजीच्या पाच गाड्यांना आग लावली. तसेच अॅम्बुलन्स आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली होती.