CoronaVirus : 'कोरोना विषाणूने आत्मपरीक्षणाची संधी दिली, आशावादही जागवला!'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 12:40 PM2020-04-12T12:40:22+5:302020-04-12T12:51:11+5:30
CoronaVirus: लाकडाऊनमुळे स्वत:ला आत्मपरीक्षण करण्यासाठी खूप वेळ आणि जागा मिळाल्याचे सांगत प्राणघातक कोरोना व्हायरसचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न विजय दर्डा यांनी केला आहे.
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा याचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनीही सुरक्षित राहा, घरीच राहा असं आवाहन केलं आहे. लॉकडाऊनच्या काळात रेखाटलेलं चित्र आणि आशादायी संदेश त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.
लाकडाऊनमुळे स्वत:ला आत्मपरीक्षण करण्यासाठी खूप वेळ आणि जागा मिळाल्याचे सांगत प्राणघातक कोरोना व्हायरसचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न विजय दर्डा यांनी केला आहे. "काम थांबत नाही; मात्र या लॉकडाऊनने मला आत्मपरीक्षण करण्यासाठी खूप वेळ दिला आहे. काल, बऱ्याच दिवसांनंतर मी हातात ब्रश घेतला आणि कोरोना व्हायरसचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे", असे विजय दर्डा यांनी म्हटले आहे.
"कोरोनाने भेदाभेद मिटवून श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब यांना समान पातळीवर आणले आहे. कोरोनाने जात, पंथ, रंग आणि धर्म या सर्व सीमा व्यापल्या आहेत. आपण सर्व एक आहोत, याची जाणीव करून दिलीय.
याचबरोबर, कोरोना संकटाने आपल्याला बऱ्यापैकी आशा दिल्या आहेत. यामध्ये पृथ्वीचे रक्षण, पर्यावरण जागरूकता, भावनिकदृष्ट्या बळकट कुटुंब आणि उद्याची एक उत्तम आशा कोरोना संकटाने दिली आहे, असं मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, विजय दर्डा यांनी रेखाटलेल्या चित्राला 'कोरोना' असे शीर्षक दिले आहे.