मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. उद्योग-व्यवसाय बंद आहेत. विक्री नाही, ग्राहक नाही, उत्पन्न नाही. मध्यंतरीच्या काळात शेतीची कामेही प्रभावीत झाली आहेत. अनेकांच्या उदरनिर्वाहाची साधने बंद झालेली आहेत. महाराष्ट्राची आर्थिक घडी पुनरूज्जीवित करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज सांगितले.
अशोक चव्हाण म्हणाले की, 'लॉकडाऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. उद्योग-व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये मर्यादित स्वरूपात उद्योग-व्यवसायांना परवानगी देता येईल का, या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली. ग्रीन झोनमध्ये असलेल्या उद्योग व व्यवसायांमधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३० टक्के कर्मचारी बोलावून काम करणे शक्य आहे का, यावर विचारविनिमय झाला. गर्दी होणारे सर्व उद्योग टाळून जसे सिनेमा किंवा लग्न-सोहळ्यांसारखे कार्यक्रम बंद ठेवण्याची सूचना यावेळी मांडण्यात आली.'
दरम्यान, 'ठिकठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना सर्व वैद्यकीय खबरदारी बाळगून आपआपल्या घरी जाण्याची परवानगी देता येईल का, यावरही चर्चा झाली. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या सिमेवर यंत्रणा उभारून त्यांची तपासणी करता येईल, अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या. पीपीई किट्स व अन्य साधनांचा जिल्ह्यांना अधिक प्रमाणात पुरवठा करण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली,' अशी माहितीही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.
'सध्याच्या आणीबाणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने उत्तम काम केले आहे. सर्व प्रकारच्या रेशन कार्डसाठी अन्नधान्य उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही, अशा वर्गाकडे अधिक लक्ष देण्याबाबत चर्चा झाली, असे चव्हाण यांनी सांगितले.
त्याबरोबरच 'शेतीची कामे तसेच सार्वजनिक बांधकाम किंवा जलसंपदा विभागाची पायाभूत सुविधांची कामे सुरू करावीत, अशीही सूचना या बैठकीत मांडली गेली. पावसाळा येत असल्याने रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे करावयाची आहेत. जी कामे यंत्राच्या मदतीने केली जातात, अशा कामांचा यामध्ये समावेश असू शकेल, अशीही चर्चा झाली, अशी माहितीही त्यांनी दिली.