coronavirus: दादर, माहिममध्ये रुग्ण रोखण्याचे आव्हान, अनलॉक झाल्यामुळे संसर्ग वाढल्याचा महापालिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 03:17 AM2020-07-11T03:17:53+5:302020-07-11T07:14:55+5:30
एकीकडे धारावीतील यशस्वी उपचार पद्धतीने आदर्श निर्माण केला असताना जी उत्तर विभागाच्या अखत्यारीतील दादर, माहिममध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या सर्वाधिक चारशे मृत्यूचे प्रमाणही जी उत्तर विभागात असल्याचे उजेडात आले आहे.
मुंबई : आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र एकीकडे धारावीतील यशस्वी उपचार पद्धतीने आदर्श निर्माण केला असताना जी उत्तर विभागाच्या अखत्यारीतील दादर, माहिममध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या सर्वाधिक चारशे मृत्यूचे प्रमाणही जी उत्तर विभागात असल्याचे उजेडात आले आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम वरळी कोळीवाडा येथे झाला. त्यानंतर धारावीतील झोपडपट्टीमध्ये झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटीवाटीच्या झोपडपट्टीत सोशल डिस्टन्सिंग शक्य नसल्याने कोरोनाचा प्रसार रोखणे पालिकेसाठी मोठे आव्हान होते. मात्र जास्तीतजास्त लोकांची तपासणी, तत्काळ निदान आणि योग्य उपचाराद्वारे धारावीने कोरोनाला मात दिली. गेल्या महिन्याभरात धारावीतील रुग्णांची संख्या दररोज सरासरी २०पेक्षा कमी आहे
.
लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होत असताना दादर आणि माहिम परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दादरमध्ये रुग्णांची संख्या ४२० एवढी होती. त्यामध्ये वाढ होत आता १,१०२ रुग्णांची नोंद झाली आहे, तर माहिममध्ये ६५१ रुग्णसंख्या १,३९९ वर पोहोचली आहे. दादर, माहिम परिसर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने लॉकडाऊन खुले झाल्यानंतर येथील दुकाने, मंडया सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याचा दावा अधिकारी करीत आहेत.
अंधेरी, मालाडमध्ये सर्वाधिक रुग्ण
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८८ हजार ७९५ एवढी आहे. यापैकी आता २२ हजार रुग्ण सक्रिय आहेत. तर सर्वाधिक ५,९८० रुग्णसंख्या विले पार्ले पूर्व, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व या के पूर्व विभागातील आहे. त्यापाठोपाठ पी उत्तर विभागात मालाड, मालवणीत एकूण ५,४९० रुग्णांची नोंद झाली आहे.
‘मिशन धारावी’ला केंद्राची शाबासकी
अडीच चौरस किलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीत सुमारे साडेआठ लाख लोकवस्ती आहे. मात्र ही झोपडपट्टी अधिक दाटीवाटीची असल्यामुळे धारावीतील संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने ‘मिशन धारावी’ ही मोहीम राबवली. मुंबईतील इतर भागांच्या तुलनेत आता धारावीत संसर्ग होण्याचा कालावधी १४१ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे धारावीतील राजीव गांधी क्रीडा संकुल आणि एका पालिका शाळेत सुरू असलेले कोरोना केंद्र बंद करण्यात आले आहे. धारावीतील यशासाठी केंद्रातील आरोग्य मंत्रालयाने पालिकेचे कौतुक केले आहे.
मुंबईत आणखी ७२२ इमारती प्रतिबंधित
मुंबई : झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर आता इमारतींमध्ये काही ठिकाणी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या ११ दिवसांमध्ये प्रतिबंधित केलेल्या इमारतींच्या संख्येत ७२२ इतकी वाढ झाली आहे. यामध्ये बोरीवली, कांदिवली, अंधेरी, वडाळा आणि मुलुंड येथील इमारतींचा सर्वाधिक समावेश आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता ४७ दिवसांनंतर दुप्पट होत आहे. हॉटस्पॉट असलेल्या वरळी, धारावी या विभागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मात्र पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर आणि पूर्व उपनगरात भांडुप, मुलुंड या ठिकाणी रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ‘मिशन झीरो’ मोहीम दोन आठवड्यांपूर्वी सुरू केली. या मोहिमेचा प्रभाव संबंधित विभागांमध्ये आता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी बाधित क्षेत्रांमध्ये नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत ३,०९७ इमारती सील तर ६९६ क्षेत्रे बाधित म्हणून जाहीर करण्यात आली होती. परंतु ३ जूनपासून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले करण्यास सुरुवात झाल्यानंतर या आकडेवारीतही वाढ होताना दिसून येत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ७९८ बाधित क्षेत्रे तर ४,५३८ इमारती सील केल्या होत्या. त्यानंतर तीन आठवड्यांत प्रतिबंधित इमारतींची संख्या ५,८७५ वर आणि आता ६,५९७ वर पोहोचली आहे.
बाधित क्षेत्रे आटोक्यात
पालिकेने २९ जून रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत ७५० क्षेत्रे बाधित होती. यामध्ये झोपटपट्टी विभागांचा समावेश सर्वाधिक आहे. गेल्या ११ दिवसांत फक्त एका बाधित क्षेत्राची भर पडली आहे.
बाधित क्षेत्रात नऊ लाख ९६ हजार ८११ निवास, ४२ लाख ८३ हजार ७८८ लोकसंख्या असून या भागात आतापर्यंत २८ हजार ५७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
प्रतिबंधित केलेल्या ६,५९७ इमारतींमध्ये दोन लाख ७९ हजार १०१ निवास, नऊ लाख ७७ हजार ७७४ लोकसंख्या आहे. या भागात आतापर्यंत १८ हजार ७४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.