Coronavirus: ना मामाचा गाव, ना खेळाचा डाव ..., मुलांचे मानसिक आरोग्य जपण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 07:45 AM2021-05-23T07:45:37+5:302021-05-23T07:46:39+5:30
Coronavirus: मागील दीड वर्षापासून शाळेच्या स्वतंत्र भावविश्वात वाढणाऱ्या मुलांना सक्तीने घरात ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले आहे. बाहेर जाऊन मैदानी खेळही खेळता येत नसल्याने, मित्र-मैत्रिणी, अभ्यास, खेळ, शिक्षकांशी असलेले भावनिक नाते हरवले आहे.
- सीमा महांगडे
मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की, मुलांची सगळ्यात आधी तयारी असते ती मामाच्या गावाला जायची! परंतु मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे मुलांना या धमाल मस्तीला मुकावे लागले आहे. या सगळ्यांमुळे घरात अडकून असलेल्या मुलांमध्ये वाढणारी चिडचिड, त्यांचा कॉम्प्युटर, मोबाईलवरील वाढता स्क्रीनटाईम आणि या सगळ्याचे त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम यावर पालकांनाही नियंत्रण राखणे अवघड होऊन बसले आहे.
अनेक पालक तर यासाठी समुपदेशकांची, मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घेऊ लागले आहेत. त्यामुळे हा कोरोनाचा लॉकडाऊन काळ म्हणजे ना मामाचा गाव, ना खेळाचा डाव, मुलांसाठी मात्र रडीचा डाव बनल्याच्या प्रतिक्रिया पालक आणि समुपदेशकांमधून व्यक्त होत आहेत.
मागील दीड वर्षापासून शाळेच्या स्वतंत्र भावविश्वात वाढणाऱ्या मुलांना सक्तीने घरात ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले आहे. बाहेर जाऊन मैदानी खेळही खेळता येत नसल्याने, मित्र-मैत्रिणी, अभ्यास, खेळ, शिक्षकांशी असलेले भावनिक नाते हरवले आहे. यामुळे मुलांच्या भावविश्वावर आघात झाल्याने पालकांना मुलांचे मनोधैर्य वाढविण्यास तारेवरची कसरत करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया पालक स्वतः देत आहेत.
मुलांच्या विकासात मानसिक आरोग्याला सर्वाधिक महत्त्व आहे. मुलांमधील भावनिक वर्तणूक व मनोसामाजिक समस्यांचे योग्यवेळी शास्त्रीय निराकरण न झाल्यास त्यांच्या मानसिकतेसह शिक्षण, आरोग्य आणि समाज वर्तनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता मानसोपचार तज्ज्ञांनीही वर्तविली आहे. मुलांच्या शारीरिक आरोग्यासोबत त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही या काळातील महत्त्वाची जबाबदारी असून त्याचा मोठा भार पालकांवर आहे. त्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी मानसिकरीत्या तयार करणे हाही त्याचाच भाग आहे. दरम्यान, पालकांनी त्यांच्या आहाराकडे पूर्ण लक्ष देऊन, आपल्या कामातून योग्य वेळ मुलांना दिला तर त्यांची मानसिक, शारीरिक वाढ योग्य होईल, असे मत शिक्षक समुपदेशक असलेल्या श्रीकांत शिनगारे यांनी मांडले.
छोट्या शाळकरी मुलांना कोरोनामुळे वर्षभर घराबाहेर जाता न येण्याने अनेक भावनिक परंतु अव्यक्त समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या काळात मुलांच्या आहार, विहार, विचार व उपचार या चार घटकांची काळजी अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहू शकेल.
- श्रीकांत शिनगारे, शिक्षक समुपदेशक, बीपीई सोसायटीज हायस्कूल.
पालकांनी काय करावे?
मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यावे.
मुलांना योगा, कसरती आणि नवीन गोष्टी शिकवून त्यात व्यस्त ठेवा.
सकारात्मक विचार करायला लावून त्यांच्याशी संवाद कायम ठेवायला हवा.