coronavirus: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिकांना दिला महत्त्वपूर्ण सल्ला, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 10:21 PM2020-08-24T22:21:10+5:302020-08-24T22:22:08+5:30
पालिकांनी कोरोनाविरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला ठाणे, कल्याण -डोंबिवली, नवी मुंबई पालिकांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई - शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगितले ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली त्यात ते बोलत होते.
या बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक यांसह सर्व मनपा आयुक्त, पोलिस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर, कल्याण-डोंबिवली आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी, आदिंनी मनपा क्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.
इतर बाबींवर देखील मनपाने लक्ष केंद्रीत करावे
मुंबईला लागून ठाणे जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली सारख्या मोठया महानगरपालिका आहेत. मुंबई प्रमाणे ठाणे जिल्हयाने देखील कोरोना प्रतिबंधासाठी चांगली काळजी घेतली आहे. मात्र आता पावसाळीआजार, खड्डे, रस्ते कचरा या इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. मनपा, वैद्यकीय यंत्रणा, पोलिस यंत्रणा, महसूल आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे काम केल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो असे मुख्यमंत्री म्हणाले
कायम सतर्क राहावे लागणार
मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु हे करत असतांना आपल्याला कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे नागरिकांनी पालन करावे. कायम सतर्क राहावे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या सर्वांना मास्कचा नियमित वापर करावाच लागणार आहे. वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे आहे.
ट्रॅकिंग व ट्रेसिंगवर भर द्यावा
यंत्रणेचे तीन भागात विभाजन आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृती करण्यावर भर द्यावा. पोलिस व महानगर पालिकांनी ट्रॅकिंग व ट्रेसिंगवर भर द्यावा. चेस द व्हायरस मोहिम प्रभावीपणे राबवावी.रुग्णाला व्हेंटीलेटरपेक्षा ऑक्सीजनची आवश्यकता आहे. रुग्ण बरा होईपर्यंत ऑक्सीजनची व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कोरोना उपचाराबाबत शंका असल्यास टास्क फोर्सला शंका विचारावी असेही त्यांनी सांगितले. सर्व मनपांच्या मागे शासन ठाम व खंबीरपणे उभे आहे. मात्र प्रयत्नांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही हे स्पष्ट करुन प्रत्येक मनपाने कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातुन प्रभावीपणे काम करावे असे त्यांनी सांगितले.