Coronavirus: राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, घेतला मोठा निर्णय, केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 08:27 PM2022-06-02T20:27:34+5:302022-06-02T20:28:42+5:30

Corona Virus In Maharashtra: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज टास्कफोर्सची बैठक बोलावली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करत जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

Coronavirus: Chief Minister Uddhav Thackeray takes serious note of growing corona patients in the state, takes big decision, appeals | Coronavirus: राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, घेतला मोठा निर्णय, केलं असं आवाहन

Coronavirus: राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, घेतला मोठा निर्णय, केलं असं आवाहन

googlenewsNext

मुंबई - जवळपास दोन वर्षांनंतर राज्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज टास्कफोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करत जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे. 

फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा
कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या  ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने याांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे आपली मते मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन
ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करुन घ्या
गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा
बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.
ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी
आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी
ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.
येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजार देखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनी देखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.   

Web Title: Coronavirus: Chief Minister Uddhav Thackeray takes serious note of growing corona patients in the state, takes big decision, appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.