Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन; काही जणांच्या मनासारखं होत नाहीत ते रागावलेत पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 01:45 PM2020-04-19T13:45:06+5:302020-04-19T14:03:19+5:30
शेती आणि कृषी वस्तूंवर बंधन नाही, जीवनावश्यक वस्तूंवर बंदी नाही, मालवाहतूक होईल पण जिल्हाबंदी कायम राहणार आहे.
मुंबई – राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णात घट होतेय हे दिसून येत आहे. मात्र कुठल्याही भ्रमात राहायचं नाही, कधी संख्या कमी होतेय कधी वाढतेय कळत नाही. गाफील राहून चालणार नाही. अर्थचक्र सुरु न केल्यास कोरोनानंतर आर्थिक संकट उभं राहिलं. त्यामुळे २० तारखेपासून राज्यात काही निर्बंध शिथील करण्यात येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.
तसेच शेती आणि कृषी वस्तूंवर बंधन नाही, जीवनावश्यक वस्तूंवर बंदी नाही, मालवाहतूक होईल पण जिल्हाबंदी कायम राहणार आहे. किमान ३ मेपर्यंत बंधन पाळणे आवश्यक आहे. काही जणांच्या मनासारखं होत नाही ते माझ्यावर रागावले आहेत. काही जण कौतुक करतायेत. वृत्तपत्रांवर बंदी नाही. पेपर स्टॉलवर वृत्तपत्र विक्री सुरु होईल पण मुंबई, पुणेसारख्या शहरात घरोघरी वृत्तपत्र वितरणास बंदी कायम राहील. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घेण्यास तयार आहे. कोरोनावर आजपर्यंत कोणतंही औषध नाही, यावर रिसर्च सुरु आहे. सध्या सोशल डिस्टेंसिंग एवढचं यावर उपाय आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्याचसोबत काही जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही, तसेच ज्या जिल्ह्यात कमी रुग्ण आहे त्यांच्यावर उपचार करुन घरी पाठवण्यात येत आहे. ग्रीन झोनमध्ये माफक स्वरुपात उद्योगधंद्यात परवानगी दिली आहे. मजुरांची आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेत असाल उद्योगांना काम सुरु करण्यास परवानगी दिली जाईल. महाराष्ट्रात शनिवारपर्यंत ६६ हजार ७९६ कोरोना टेस्ट केल्या आहेत यातील ९५ टक्के लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ३ हजार ६०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ३०० पेक्षा जास्त लोकांना कोरोनावर उपचार करुन घरी पाठवलं आहे. ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय त्यातील ७५ टक्के सौम्य लक्षण असणारे रुग्ण आहेत. जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्राधान्य आहे. काही रुग्ण शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांकडे येत आहे. कोरोना रिपोर्ट येईपर्यंत काही रुग्णांचे दुर्दैवी निधन झालं आहे. कोणतंही लक्षण लपवू नका, घरच्या घरी उपचार करु नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केलं आहे.
कोरोना शत्रू दिसत नाही त्यामुळे पंचाईत आहे, आपल्याच माणसांना घेऊन तो हल्ला करतोय. कोरोना व्हायरस येऊन राज्यात ६ आठवडे उद्या पूर्ण होतील. ताप, सर्दी ही लक्षणे आहेत त्यांनी न घाबरता डॉक्टरांकडे या, जितक्या लवकर तुम्ही याल तितक्या लवकर उपचार होऊन घरी जाल. कोरोना झाला म्हणजे संपलं असं नाही, ६ महिन्याच्या बाळापासून ८० वर्षापर्यंत अनेक रुग्ण बरे झाले आहेत. मी खासगी डॉक्टरांशी संवाद साधला आहे. तेदेखील या लढाईत पुढाकार घेणार आहे. नॉन कोविड रुग्णांसाठी उपचार करणार आहे. फक्त कोरोना नाही तर इतर आजारांवर उपचार करण्यात येत आहे. सरकार म्हणून आम्ही सर्वोतोपरी मदत करतोय असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिला.
अडचण असल्यास या क्रमांकावर संपर्क करा
दरम्यान,या लॉकडाऊन कालावधीत घराघरात महिलांवरील अत्याचार होता कामा नये, असे होत असेल तर महिलांनी १०० नंबर फिरवा. याशिवाय मानसिकरीत्या अस्वस्थता वाढली असेल आणि समुपदेशनाची गरज असेल तर मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या १८००१२०८२००५० क्रमांकावर तसेच आदिवासी विकास विभाग / प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुलता यांच्या १८००१०२४०४० क्रमांकावर जरूर संपर्क साधा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
परराज्यातील मजुरांना पुन्हा एकदा आवाहन
इतर राज्यातल्या मजुरांनीही सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. घरच्यांकडे जाताना मनात भीती ठेवून जाऊ नका, खुशीने जा, केंद्र सरकारशी बोलणं सुरु आहे. राज्यात काही ठिकाणी काम सुरु होत आहे तुम्ही कामावर जाऊ शकता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही स्वरुपात धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार नाही. रेल्वे, विमान वाहतूक मुंबईत सुरु होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात?; विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या शिफारशीला हायकोर्टात आव्हान
...पण ‘त्या’ निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येतेय; संजय राऊतांची जहरी टीका
उद्धव सरकारचा अजब फतवा; वृत्तपत्र छपाईला परवानगी, पण वितरणावर निर्बंध
मग हे सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का?; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
...मग उरलेले ५४ हजार कोटी कोणासाठी ठेवलेत?; भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं चॅलेंज
लॉकडाऊन राहणारच; पण उद्योग, व्यापाराला मर्यादीत सूट देणार