coronavirus: नागरिकांनाच क्वारंटाइन सेंटरमध्ये राहायचे नाही? पालिकेकडून चौकशीस सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:56 AM2020-07-09T01:56:09+5:302020-07-09T01:56:31+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयास्पद ठिकाणच्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून अन्य ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येते. क्वारंटाइन सेंटरमध्ये सुविधांचा अभाव, अस्वच्छता, तसेच पालिका व प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष या अनेक बाबी उघड झाल्या आहेत.
- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : पालिकेच्या पी दक्षिण विभागातील क्वारंटाइन सेंटरमध्ये नाश्त्याला ‘अळ्यांचा शिरा’ दिला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. मात्र स्वत:च्या सुखसोयी असलेल्या घरातून बाहेर काढून गैरसोय होणाऱ्या क्वारंटाइन सेंटरमध्ये राहणे लोकांना आवडत नाही. त्यामुळेच तेथून बाहेर पडण्यासाठी हे प्रकार केले जात आहेत का? याची चौकशी पालिकेकडून करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयास्पद ठिकाणच्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून अन्य ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येते. क्वारंटाइन सेंटरमध्ये सुविधांचा अभाव, अस्वच्छता, तसेच पालिका व प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष या अनेक बाबी उघड झाल्या आहेत. पालिकेच्या पी उत्तर विभागात मोडणा-या आणि क्वारंटाइनसाठी असलेल्या चिंचोली शाळेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे येथे राहायला लोकांना आवडत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
क्वारंटाइन सेंटरमध्ये राहायचे नसल्याने अनेक जण तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याचसाठी जेवणात जिवंत अळ्या किंवा माश्या टाकण्याचा प्रयत्न हेतुपूर्वक होतोय का? याची चौकशी पालिका करत असल्याचे समजते.
आरेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये शिºयात सापडलेल्या अळ्या या शिजलेल्या नव्हत्या. ठरावीक संबंधित कंत्राटदार अनेक ठिकाणी त्याचा पुरवठा करतो. त्यामुळे तक्रार सर्व ठिकाणाहून येणे अपेक्षित होते. मात्र असे झाले नाही. त्यामुळे लोकांनी केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे याची चौकशी करण्यात येत आहे.
कंत्राटदाराला ३० हजारांचा दंड
आरे कॉलनीच्या रॉयल पंप इस्टेट १६९ येथे असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवणात अळ्या सापडल्याचा प्रकार घडला होता. त्यानुसार चौकशीअंती कंत्राटदाराला पालिकेच्या पी दक्षिण विभागाकडून ३० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.