Kishori Pednekar On Coronavirus Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. प्रामुख्यानं मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आपल्या नागरिकांसाठी योग्य ते निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलं.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेकांशी चर्चा करून निर्णय घेत आहेत, लोकं सध्या धास्तावले आहेत. पुढील काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन नक्कीच होणार नाही. परंतु अशा प्रकारे बेफिकीरिने काही नागरिक वागत राहिले, तर मात्र संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. घाबरण्यापेक्षा सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे," असं महापौर म्हणाल्या. जर आपण काळजी घेतली, तर आपण नक्कीच या संकटावर मात करू शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.
"आज डॉक्टर्स, बीसएटी कर्मचारी बाधित होत आहेत हे आपण पाहत, वाचत आहोत. हीच संख्या अशीच वाढत राहिली, सध्या बेड्स रिकामे असल्यानं आम्ही त्या निर्णयापर्यंत पोहोचत नाही," असंही त्यांनी सांगितलं. आज मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांशी बोलून निश्चित निर्णय होईल. शनिवार, रविवार विकेंड असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढते. धोक्याची पातळी ओलांडली जात असताना, मुख्यमंत्री हळूवार आणि खंबीरपणे निर्णय घेत आहेत. संध्याकाळी सात पर्यंतही कदाचित आपल्याला निर्णय समजू शकणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री घाईनं निर्णय घेणार नाहीतजे काही निर्णय आहेत, त्यात कदाचित वाढ होऊ शकेल. सौम्य स्वरुपाची लक्षणं असलेल्यांनी जर काळजी घेतली नाही, तर धोक्याची पातळी ओलांडून गेल्यानंतर होणारी धावपळ होईल ती रोखण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक विचारानं चालले आहेत. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या नागरिकांना हे माहितीये की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही घाईनं निर्णय घेणार नाहीत आणि धोक्याची पातळी ओलांडून देणारही नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या तरी आम्ही पूर्ण लॉकडाऊनच्या विचारात नाही, असंही त्यांनी सांगितलं.