Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता
By प्रविण मरगळे | Published: February 23, 2021 02:56 PM2021-02-23T14:56:10+5:302021-02-23T14:57:57+5:30
CM Uddhav Thackeray holds meeting with BMC Officials on Corona situation: १ फेब्रुवारीपासून मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी ठराविक वेळेसाठी खुली करण्यात आली, तेव्हापासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे
मुंबई – राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली आहे, गेल्या ४ दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला ६ हजारांच्या वर पोहचली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी शिस्त पाळावी, मास्क वापरावा असं आवाहन केले आहे. पुढील ८ दिवस महत्त्वाचे आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगितलं होतं.(CM Uddhav Thackeray to hold a meeting today with BMC Commissioner and officials, to review the COVID19 situation)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. १ फेब्रुवारीपासून मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी ठराविक वेळेसाठी खुली करण्यात आली, तेव्हापासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, राज्यात अमरावती, अकोला, पुणे याठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे, मुंबईतही लोकलबाबत आणि संचारबंदीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray to hold a meeting today with BMC Commissioner and officials, to review the COVID19 situation pic.twitter.com/M2lmU9vWYd
— ANI (@ANI) February 23, 2021
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३२१ दिवसांवर
सोमवारी मुंबईत ६३४ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत तीन लाख १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सोमवारी ३२१ दिवसांवर गेला आहे. रविवारी हा आकडा ३४६ दिवस होता. सध्या ७ हजार ३९७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर उपनगरात १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत ३१ लाख ४६ हजार ७२२ चाचण्या झाल्या आहेत. सोमवारी दिवसभरात ७६० रुग्ण आणि चार मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर उपनगरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन लाख १९ हजार ८८८ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ४४६ झाला आहे. मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या ५४ आहे. मागील २४ तासांत पालिकेने चार हजार ६४२ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.
राज्यात २४ तासांत ६ हजारापेक्षा अधिक रूग्ण आढळले
राज्यात रविवारी ६,९७१ रुग्ण आणि ३५ बाधितांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत सोमवारी नवीन बाधित तसेच मृत्यूंचे प्रमाण काहीसे कमी झाले. सोमवारी दिवसभरात ५,०३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत एकूण १९,९९,९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५७,९३,४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१३.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,०५४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १,८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २.४६ टक्के आहे.