Join us

Coronavirus: ‘एकजुटीने हिंमतीने कोरोनाशी सामना करा; आग भडकवण्याचं काम करु नका अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 8:31 PM

कोविडचं संकट गेल्यानंतर आणखी एक संकट येणार ते म्हणजे आर्थिक संकट, या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिगटाची समिती नेमली आहे.

ठळक मुद्देकोविडचं संकट गेल्यानंतर आणखी एक संकट येणार आहेजेवढ्या लवकरात लवकर संकट संपेल तितक्याच लवकर लॉकडाऊन संपेलआगीचे बंब भरपूर आहेत आग भडकवण्याचं काम करु नका

मुंबई - परराज्यातील कामगारांनी घाबरण्याचं कारण नाही, तुम्ही आमच्या राज्यात आहात आम्ही तुमची जबाबदारी घेतली आहे. त्या मजुरांना वाटलं १४ तारखेनंतर ट्रेन सुरु होतील पण तसं झालं नाही. लॉकडाऊन म्हणजे लॉकअप नाही, तुम्ही सुरक्षित आहात. ज्या दिवशी लॉकडाऊन संपेल तेव्हा आम्ही तुमच्या जाण्याची व्यवस्था करु, तुम्ही हिंमतीने भारतीय म्हणून या संकटाचा सामना करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

तर यामध्ये कोणी राजकारण करु नका, यांच्या भावनांशी खेळून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर तो राज्याच्या कायद्यातून सुटणार नाही, आगीचे बंब भरपूर आहेत आग भडकवण्याचं काम करु नका. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन सगळेजण लढतायेत अशाप्रकारे इशाराही मुख्यमंत्र्यांनी समाजकंटकांना दिला.   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळ्यांशी मी बोलतोय, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, सोनिया गांधी यांच्याशी बोलणं झालं, शरद पवार हे तर सोबत आहे, राजदेखील सोबत आहे. मुल्ला-मौलवी यांच्याशी बोलतोय. मालेगावात काही तरी पसरतंय त्याला साथ देऊ नका, अफवा पसरवू नका असं विनंती केली आहे. जेवढ्या लवकरात लवकर संकट संपेल तितक्याच लवकर लॉकडाऊन संपेल. कोरोना साखळी तोडण्यासाठी आपल्या एकजुटीची गरज आहे. हे युद्ध आरामात जिंकू पण त्यासाठी घरी राहून सुरक्षित राहा. आजपर्यंत जे सहकार्य केलं ते यापुढेही कायम ठेवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

त्याचसोबत संपूर्ण देशात जितक्या चाचण्या झाल्या नाहीत तेवढ्या राज्यात होत आहे, महाराष्ट्र सरकार खंबीरपणे कोरोनाशी मुकाबला करतंय. कोरोनाची लागण झाली म्हणजे संपलं असं नाही. योद्धा तनिष्क मोरे सहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलं. त्याच्या आईशी माझं बोलणं झालं. कोरोनावर मात करु शकतं त्यानंतर ८३ वर्षाच्या आजीला फोन केला त्यांनीही कोरोनावर मात करुन दाखवली आहे. ही लढाई अधिक प्रखरतेने लढण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फॉर्स तयार करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील डॉक्टर्स तज्ज्ञांची टीम बनवली आहे. या आजारातून लोकांना कसं बरं करु शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांची पहिली बैठक माझ्यासोबत झाली आहे अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

कोविड आणि नॉन कोविड अशाप्रकारे रुग्णांची विभागणी करण्यात येत आहे. कोविडचं संकट गेल्यानंतर आणखी एक संकट येणार ते म्हणजे आर्थिक संकट, या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिगटाची समिती नेमली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यासाठी ही समिती काम करेल. डॉ. रघुनाश माशेळकर, विजय केळकर, अजित रानडे यांच्यासारख्या नामवंतांची टीमदेखील तयार केली आहे. आर्थिक व्यवस्था कशी उभारता येईल. अर्थ व्यवस्थेचं नुकसान कसं टाळता येईल याबाबत अभ्यास सुरु झाला आहे.

बळीराजा हा जगाचा आत्मा आहे. अन्नदात्याला कुठेही लॉकडाऊनमध्ये अडवलं नाही. जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, शेतीविषयक माल, साहित्य यांची ने-आण सुविधा कुठेही थांबणार नाही असं सांगितले आहे. २० तारखेनंतर राज्यात कोणते उद्योगधंदे सुरु करता येईल याबाबत मंत्र्यांची समिती निर्णय घेईल.

महाराष्ट्रातील जवळपास १० जिल्ह्यात कोरोना विषाणूला प्रवेश करु दिला नाही. उर्वरित महाराष्ट्रातून या विषाणूला हद्दपार करायचं आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात अधिक खबरदारी घेत आहोत. कोरोना चाचणी केंद्र वाढवण्यात येत आहे. ज्याठिकाणी लागण झालेली व्यक्ती सापडली त्यांच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं जात आहे. या कनेंटमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची सोय केली आहे.

सगळेजण या संकटात मुकाबला करण्यासाठी पुढे येऊन मदत करत आहेत. हे युद्ध सुरु असताना ही वेळ राजकारणाची नाही हे मी नेहमी सांगत आहे. आलेलं संकट धीराने लढून परतवण्याचं आहे. आदिवासी आणि दुर्गम विभागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पावसाळ्यात करायची असते तीदेखील तयारी आपण सुरु केली आहे. कोरोनासाठी वेगळी यंत्रणा काम करत आहे. मात्र आदिवासी बांधवांसाठीही तयारी सुरु करण्यात आली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त, शिक्षण घेतलेले त्यांना आवाहन केले होते. ज्यांची इच्छा आहे त्यांनी संपर्क करावा असं सांगितले होतं. आज सकाळपर्यंत २१ हजार लोकांनी कोविड योद्धा म्हणून काम करण्यास तयारी दाखवली आहे. एकजुटीची आणि लढण्याची भावना आपल्यात आली आहे.  केंद्र आणि राज्य हातात हात घालून काम करत पुढे चाललंय. शिवभोजन थाळी ८० हजारांपर्यंत वाढवली आहे. साडेपाच ते सहा लाख परराज्यातील मजुरांची सोय केली जात आहे.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस