Coronavirus: "कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 01:36 AM2020-06-30T01:36:36+5:302020-06-30T01:37:52+5:30

आपण अनलॉकमधील नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल तर तुम्हाला कुणी अडवणार नाही.

Coronavirus: CM Uddhav Thackrey Appeal to people over corona crisis | Coronavirus: "कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, तर..."

Coronavirus: "कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, तर..."

Next

मुंबई : कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. हे अजिबात अपेक्षित नाही. यामुळे कोरोनाची साथ जी आपण आटोक्यात ठेवली आहे, ती मोठ्या प्रमाणात वाढून आव्हान उभे राहील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला

मुंबई पोलिसांनी २ किमी अंतराचे निर्बंध टाकले त्यामागे अनावश्यक वावराला रोखणे हाच उद्देश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळा, कोरोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते.

आपण अनलॉकमधील नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल तर तुम्हाला कुणी अडवणार नाही. पण कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, वाहनांची गर्दी होणार असेल तर तुम्ही स्वत:चा आणि इतरांचाही धोका वाढवीत आहात हे लक्षात ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.

मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांनी समन्वयाने या पावसाळ्यात कुठेही पाणी साचून नागरिकांचे हाल होणार नाहीत, असे पाहावे. तसेच नालेसफाई करताना लोकप्रतिनिधी तसेच इतर सर्वांच्या संपर्कात राहून तातडीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले. पावसाळ्यामध्ये मेट्रोच्या कामांमुळे तयार झालेल्या खड्ड्यांत पाणी साचण्याचा आणि पर्यायाने दुर्घटना घडणे, रोगराई वाढण्याचा संभव असल्याने सर्व प्राधिकरणानी एकत्र येऊन ही कामे पूर्ण करावीत असेही ते म्हणाले.

मेट्रो व इतर पायाभूत सुविधा कामे आज ज्या ठिकाणी कामगारांअभावी खोळंबली आहेत तिथे तातडीने स्थानिक व्यक्तींना रोजगार देऊन ती सुरू करा, अर्धवट बांधकामे झाली आहेत तिथला कचरा, साहित्यांचे ढीग हे बाजूला करणे गरजेचे आहे. अजून पावसाला वेग आला नाही, शक्य तेवढी ही कामे हातावेगळी करा असेही ते म्हणाले.

Web Title: Coronavirus: CM Uddhav Thackrey Appeal to people over corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.