CoronaVirus सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची परवड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 06:30 AM2020-04-10T06:30:28+5:302020-04-10T06:30:51+5:30
सरकारी अनास्थेचा ताप : ठाणे पालिकेने जाहीर केलेल्या रुग्णालयांत तपासणीची दैना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाचपाखाडी भागात राहणाऱ्या संतोष पाटील (नाव बदलले आहे) यांचा घसा गेल्या चार दिवसांपासून खवखवतोय. कणकण आणि खोकलाही आहे. कोरोनाची लागण तर झाली नाही ना या भितीपोटी त्यांचा डोळ््याला डोळा लागत नाही. घराजवळील खासगी दवाखाने बंद आहेत आणि पालिकेने जाहीर केलेल्या हॉस्पिटलमध्येही तपासणी झाली नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेले पाटील घरीच बसून आजार बरा होण्याची वाट बघत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ठाणे पालिकेककडून होणारे प्रयत्न किती कुचकामी आहेत हेच यातून अधोरेखीत होते.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणीक वाढत असल्यामुळे संभाव्य रुग्णांचे वर्गिकरण करून त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार ठाणे पालिकेने २८ दिवसांमध्ये परदेश प्रवास केलेल्या व्यक्ती, त्यांच्या संपर्कात आलेले लोक आणि ज्यांना सर्दी, खोकला घसा खवखवणे असा त्रास आहे़ अशा तीन गटांत संभाव्य रुग्णांची वर्गवारी केली आहे. त्यांनी तपासणीसाठी कुठल्या रुग्णालयात जायचे याची यादीसुध्दा प्रसिध्द केली आहे.
वर्गिकरण केलेल्या तिसºया गटातील रुग्णांवर औषधोपचारासाठी नजिकचे खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे बुधवारी दुपारी संतोष पाटील यांनी आपल्या फॅमेली डॉक्टरांना फोन केला. लक्षणे थोडी गंभीर वाटल्यामुळे या डॉक्टरांनी पालिकेच्या आवाहनाची प्रत पाटील यांना पाठवली. त्यात नाव असलेल्या नजिकच्या कौशल्य रुग्णालयात तपासणीसाठी पाटील यांनी धाव घेतली. मात्र, इथे तपासणीसाठी डॉक्टरांची व्यवस्था नाही. तुम्ही सिव्हिलमध्ये जा, असा सल्ला त्यांना देण्यात आला. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना सिव्हिलमध्ये दाखल केले जाते हे माहित असल्याने भितीपोटी पाटील यांनी पुन्हा घर गाठले. औषधांच्या दुकानातून सर्दी, खोकल्याची औषधे घेणारे पाटील आपला आजार कधी बरा होतोय या प्रतिक्षेत आहेत. पालिकेतील अधिकाऱ्यांकडे त्याबाबत विचारणा केली असता असे प्रकार घडत असतील तर त्या रुग्णालयांना योग्य समज दिली जाईल. तसेच, रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजीही घेतली जाईल असे उत्तर देण्यात आले.
डॉक्टरांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर चर्चा
ठाण्यातील डॉक्टरांच्या व्हॉटस अॅप ग्रुवपर या प्रकाराबाबत चर्चा सुरू असून आणखी दोघांनी अशाच स्वरुपाचे अनुभव तिथे मांडले आहेत. पालिकेने प्राधिकृत केलेल्या रुग्णालयांतील कर्मचाºयांना नक्की काय काम करायचे आहे याची कल्पनाच नाही. सर्व काही कागदावरच असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. दुर्देवाने पाटील यांना कोरोनाची लागण झाली असेल तर काय, असा प्रश्न त्यांच्या फॅमिली डॉक्टरने उपस्थित केला आहे.