मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण सार्वजनिक वाहतूक बंद झाली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीची सेवा सुरू आहे. मात्र या सेवा कमी पडत असल्याने जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न झाल्यास थेट निलंबित करण्याचे आदेश एसटीचे महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिलेत.
वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, विविध बँकांमध्ये काम करणारे या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यासाठी पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकांहून आणि मुंबईतील बोरिवली, वाशी, दादर व ठाणे या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यंत एसटीची सेवा सुरू आहे. मात्र ही सेवा अपुरी पडत असल्याने अतिरिक्त सेवा पुरविण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. यासाठी मुंबई, ठाणे , पालघर विभागामार्फेत 600 बस चालविण्यात येणार आहेत. मात्र एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी वाहतुकीचा आढावा घेतल्यास दिलेल्या नियोजनाच्या तुलनेत फक्त 30 टक्केच वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. --------------------------असे दिले आहेत आदेश चालक, वाहक, पर्यवेक्षकीय व इतर कर्मचाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर हजर होण्यासाठी लेखी आदेश द्यावे, आदेशानंतरही कर्तव्यावर येत नसल्यास त्यांची गैरहजेरीच्या कालावधीतील वेतन मिळणार नाही, जे कर्मचारी आदेशानंतर कर्तव्यावर येणार नाही त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करावी, गाड्यांचे निर्जंतुकीकरणच मार्गस्थ करण्यात याव्या, गाडी मध्ये सामाजिक अंतर राखूनच प्रवाशांची वाहतूक करावी, जागेची आवश्यकता भासल्यास जवळची शाळा भाड्याने घ्यावी, शाळेचे निर्जुंतुकीकरण दररोज करण्यात यावे, कामगिरीवर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायजर प्रशासनाकडून पुरविण्यात यावे , कर्मचाऱ्यांचे निवास न्याहारी, भोजनाची व्यवस्था करण्यात यावी.
आगारात पोहचायचे कसे ?लॉकडाऊन असल्याने कामगारांना आगार पोहचण्यासाठी पर्यायी वाहतूक नाही. काही कामगार मुंबई महानगराबाहेर आहेत. त्यामुळे त्यांना मुंबई येण्यास सुविधा नाही. परिणामी आगारात पोहचायचे कसे, असा प्रश्न कामगारांना पडला आहे.