मुंबई : शहर, उपनगरात चाचण्यांचे प्रमाण सुरळीत असून काेराेना रुग्णनिदानाचा दर घसरत चालला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पहिल्यांदाच मुंबईचा रुग्ण पॉझिटिव्हीटीचा दर १० टक्क्यांच्या खाली आला आहे.
जून महिन्यापर्यंत दर दिवसाला १०० चाचण्यांचे प्रमाण होते, त्या वेळेस पॉझिटिव्ह दर २० टक्के दिसून आला. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याच्या परिमाणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पॉझिटिव्ह दर ५ टक्क्यांच्या खाली, तर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने पॉझिटिव्ह दर १० टक्क्यांच्या खाली असावा असे नमूद केले आहे.
गेल्या १० दिवसांत १ लाख ३१ हजार ३०१ चाचण्यांनंतर १३ हजार ५३९ रुग्णांचे निदान झाले. यापूर्वी संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे प्रमाण १ लाख ९५ हजार ६६८ चाचण्यांमागे ३१ हजार ५३ इतके होते. मुंबईत ऑक्टोबर महिन्यात दिवसाला १३-१५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. १ लाख ३१ हजार चाचण्यांमध्ये ५८ हजार ६०० अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. त्या चाचण्यांच्या माध्यमातून रुग्ण निदानाचे प्रमाण केवळ पाच टक्के आहे. ऑक्टोबरच्या पंधरवड्यात अँटिजन चाचण्यांचे प्रमाण हे ४० टक्के राहिले आहे. तर दुसरीकडे आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी झाले असून, मागील दहा दिवसांत हे प्रमाण २० टक्क्यांच्या खाली गेले आहे.
संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी गरजेचीपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, रुग्ण निदानाचे प्रमाण घटत असले तरीही मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि स्वच्छता राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे बदल सामान्यांनी जीवनशैलीत स्वीकारले पाहिजेत. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.