मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शासनाने सर्वसामान्यांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे एरव्ही घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना काही क्षणांचा ब्रेक मिळाला आहे. संसर्ग टाळण्यासाठी घरी राहण्याच्या केलेल्या या सूचनांचे पालन करून मिळालेला वेळ हरवत चाललेला संवाद पुन्हा नव्याने फुलवण्यासाठी वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. गॅझेट्सच्या विश्वास हरवत चाललेली ‘कनेक्टिव्हिटी’ यानिमित्ताने पुन्हा करता येईल, असे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने प्रवासी, नातेवाईक आणि मित्रांसोबतचा एकमेकांना भेटून होणारा ‘संवाद’ काळाच्या ओघात हरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र कोरोनामुळे मिळालेल्या वेळेत घरी राहून ज्येष्ठ नागरिक, लहानग्यांशी नाते घट्ट करून पुन्हा एकदा नात्यांची नाळ जोपासता येईल, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नूतन शहा यांनी सांगितले. विविध कंपन्यांच्या महागड्या मोबाइलवर आॅनलाइनची सुविधा असल्याने त्या माध्यमातून अनेकांचा आॅनलाइन संवाद होत आहे; पण यामुळे प्रत्यक्ष भेटीतील आनंद लोपत चालला आहे. रेल्वे, बसगाड्या किंवा इतरही अनेक वाहनांमधून प्रवास करणारे एकमेकांशी आदराने बोलायचे. एकमेकांची चौकशी करायचे, चर्चेतून सुसंवाद घडायचा. शेतीचे हंगाम, आपापल्या भागातील पीक परिस्थिती, पाऊसपाणी, गावच्या जत्रा, नातेवाइकांची विचारपूस, स्थानिक राजकारणापासून ते थेट दिल्लीच्या राजकारणापर्यंत चर्चा झडायची. राज्य व केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांबाबत साधकबाधक चर्चा व्हायची. आता पुन्हा एकदा मोकळ्या वेळेत आपल्या माणसांशी जोडण्याचा, संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून याकडे पाहावे, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद करंदीकर यांनी केले.सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणसांमधील नात्याचे दोर तुटत चाललेत. आई-बाबा आणि मुले यांतील नाते काही वेगळेच आहे, या नात्याला तोड नाही, पण सध्याच्या धकाधकीच्या काळात हे नाते टिकवायला मात्र आज वेळ नाही. शहरांमध्ये तर मुले शाळेत, महाविद्यालयात, नोकरीमध्ये व्यस्त असतात आणि आई-बाबादेखील दोघेही कामात व्यस्त असल्याने आई-बाबा व मुले यांच्यातील जवळीकता, संवाद कमी होताना दिसतो. यामुळे मनात गैरसमज निर्माण होऊन जिव्हाळा कमी होऊ लागतो. अशा वेळी आई-बाबा हे मुलांपासून दुरावतात. मग राग-रुसवा येऊन चांगल्या नात्याला धक्का बसतो. नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी आई-बाबा आणि मुले यांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे, असे मत डॉ. आनंद करंदीकर यांनी मांडले.
Coronavirus : संवाद साधा, कनेक्ट व्हा ! मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 3:15 AM