मुंबई - केंद्रातील मोदी सरकारने तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन प्रचंड बेफीकीरी दाखवली आणि त्याचे दुष्परिणाम इतर राज्यांबरोबर महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तबलिगी समाजचा दिल्लीतील कार्यक्रम व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या भूमिकेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत ते अतिशय गंभीर आहेत त्याची उत्तरं भाजपाने द्यावीत अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
याबाबत सचिन सावंत म्हणाले की, गेल्या सहा वर्षातील अत्यंत घिसाडघाईच्या व बेफिकीर कारभारामुळे देश पाठी गेला असून या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी हे अशाच बेफीकीरीचे प्रतिक आहे, असे असतानाही तबलीगचा वापर करून जातीयवाद पसरवण्याचे राजकारण करणाऱ्या भाजपा नेत्यांनी कृपा करून ते करु नका अशी हात जोडून विनंती आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच तबलिगी जमातने महाराष्ट्रातही संमेलन घेण्याबाबत परवानगी मागितली होती परंतु संभाव्य संकटाची जाण ठेवून महाराष्ट्र पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे प्रचंड धोका टाळला गेला. परंतु दिल्लीत होणाऱ्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी परवानगी तर दिलीच परंतु त्याचदिवशी केंद्र सरकारने पत्रक काढून कोरोना व्हायरस ही आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणी नाही असा निर्वाळा दिला होता. इतकेच काय संसद ही अनेक दिवस चालू ठेवून देशातील तमाम नेतृत्वालाही केंद्र सरकारने धोक्यात टाकले होते असा आरोप काँग्रेसने केला.
दरम्यान, दिल्ली पोलिसांना तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाची अधिकृत परवानगी नाकारता आली असती. त्याचबरोबर तिथे किती लोक आहेत, कोण परदेशातून आले याची इत्यभूत माहिती त्यांना होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तेथे गेले तेव्हा हे स्पष्ट होते. त्यामुळे ही बेफिकीरी जाणीवपूर्वक राजकारण करण्याकरता केली का? हा प्रश्न उपस्थित होतो असं सावंत यांनी म्हटलं आहे.
त्याचसोबत ज्यापद्धतीने भाजपाकडून कोरोनाचा विषय हा हिंदू-मुस्लीम अशा पद्धतीचे धृवीकरण करण्यासाठी केला जात आहे त्यातून ही शंका अधिक गडद होते. खरं तर महाराष्ट्रातील जनतेवरचा धोका अधिक वाढवण्याचे पाप हे केंद्र सरकारने केले आहे. संपूर्णपणे केंद्र सरकारचा दोष असताना किरीट सोमय्यांसारखे भाजपा नेते राज्यपालांकडे जाऊन अशा संकटाच्यावेळी राज्यात तबलिगी जमातबद्दलची माहिती मागतात त्यावेळेस कोरोनाबरोबरच समाजात जातीयवादी व्हायरस पसरवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे असे दिसते. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत देश जात असताना तरी जातीयवादाच्या हीन राजकारणाचा त्याग करावा असा टोला सचिन सावंत यांनी भाजपाला लगावला आहे.