मुंबई- एकीकडे मुंबईतील उत्तुंग इमारतींमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना झोपडपट्टी आणि चाळी मात्र कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. सोमवारी प्रतिबंधित क्षेत्रांच्या आकड्यात मोठी घट होऊन सध्या केवळ दहा चाळी व झोपडपट्ट्या बाधित क्षेत्रात आहेत. यापैकी भांडुप विभागात सहा, कुर्लामध्ये दोन, तर वांद्रे आणि परळ भागात एक प्रतिबंधित क्षेत्र उरले आहे.(Coronavirus)
आतापर्यंत एकूण २७४५ चाळी व झोपडपट्टी बंधनमुक्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, फेब्रुवारी २०२१ पासून मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. परंतु, यावेळेस ही वाढ झोपडपट्टी व चाळीत नव्हे तर इमारतींमध्ये वाढल्याचे उजेडात आले आहे. महापालिकेने गेल्या महिन्यात नियमात सुधारणा करीत पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळ्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रतिबंधित इमारतींचा आकडा १३०० वर पोहोचला होता.
मात्र आठवड्याभरात सील इमारतींच्या संख्येतही मोठी घट होऊन सध्या १३७ इमारती प्रतिबंधित आहेत. यामध्ये अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागात सर्वाधिक १९ प्रतिबंधित इमारती आहेत. त्यानंतर चेंबूर - १८, भांडुप - १६, वांद्रे पश्चिम - १२, परळ - १२ इमारती प्रतिबंधित आहेत. तर मुंबईत बहुतांशी भागात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही.
प्रतिबंधित इमरती नव्हे मजले अधिक...
पालिकेच्या नियमानुसार बाधित रुग्णांचा आकडा पाचपेक्षा कमी असल्यास त्या इमारतीचा बाधित मजला सील केला जात आहे. मात्र प्रतिबंधित इमारतींची संख्या दाखविताना त्यात प्रतिबंधित मजले दाखविण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे विभाग कार्यालयांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर पालिकेने आता प्रतिबंधित मजल्यांची वेगळी यादी देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबईत १८६३ ठिकाणी मजले प्रतिबंधित आहेत. सर्वाधिक मजले अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, ग्रॅण्ट रोड, मालाड, मुलुंड, चेंबूर, गोरेगाव, कांदिवली या भागात आहेत.
* चाळी - झोपडपट्टी प्रतिबंधित - दहा, लोकसंख्या -६१ हजार
* प्रतिबंधित इमारती -१३७, लोकसंख्या – १ लाख २७ हजार
* प्रतिबंधित मजले – १८६३, लोकसंख्या – ३.८२ लाख