Coronavirus: ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप्स’ अनेक देशांत ठरले अपयशी, तज्ज्ञांनी सांगितले कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 06:23 AM2021-05-23T06:23:09+5:302021-05-23T06:24:12+5:30
Coronavirus: कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या अलेस्सांद्रो अकिस्ती यांचे प्रतिपादन; गोपनीयतेचे मुद्दे अधिक तीव्र झाले आहेत
- अंकिता देशकर
मुंबई : कोरोना महासाथीच्या काळात जगभरात ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप्स’ उदयाला आले. अनेक देशांनी तर स्वत:च ॲप विकसित करत लोकांना त्याला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. अलीकडेच यासंदर्भात एक पाहणी करण्यात आली. त्यात ‘एनएचएस’ या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप’मुळे हजारो लोकांचे प्राण वाचले, असा दावा करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर कार्नेगी मेलन या प्रख्यात विद्यापीठाच्या हाईन्स महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान आणि सार्वजनिक धोरण विभागाचे प्राध्यापक अलेस्सांद्रो अकिस्ती यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ( Contact tracing apps fail in many countries)
‘लोकमत’शी बोलताना अकिस्ती म्हणाले की, ‘बऱ्याच देशांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप्लिकेशन अपयशी ठरले. यासंदर्भात नजीकच्या काळात तज्ज्ञांमध्ये चर्चाही होईल. अनेकांच्या मते गोपनीयतेच्या मुद्द्यांमुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप्स अपयशी ठरले तर काहींच्या मते ॲप्सच्या अपयशाला गोपनीयता हे कारण ठरलेले नसून, बाह्य आर्थिक संकल्पना (इकॉनॉमिक कन्सेप्ट ऑफ एक्सटर्नलिटीज) कारणीभूत ठरली आहे. बाह्य आर्थिक संकल्पना आणि नेटवर्क प्रभाव यातून ॲप्सच्या अपयशाची कारणे समजून घेता येतील. अधिकाधिक लोकांनी या संकल्पनांचा स्वीकार केल्यास लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्यातूनच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप्सला यश प्राप्त होऊ शकेल. जेवढा स्वीकार कमी तेवढे ॲप्सचे यशही मर्यादीत राहील.’
भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केले आहे. भारतातील परिस्थिती लवकरच नियंत्रणात यावी, ही सदिच्छा! लोकांनी लसीचे डोस लवकरात लवकर घ्यावेत तसेच कोरोना काळातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- अलेस्सांद्रो अकिस्ती,
कार्नेगी मेलन विद्यापीठाचे प्राध्यापक
अलेस्सांद्रो अकिस्ती यांनी मांडलेली निरीक्षणे
जेवढ्या जास्त प्रमाणात ॲप्लिकेशन्सचा वापर झाला असता, तेवढ्या अधिक प्रमाणात आर्थिकदृष्ट्या गतिशीलता पाहण्यास मिळाली असती.
कोरोनामुळे लोकांच्या हालचालींवर निर्बंध आले आहेत. अनेकांना घरूनच काम करावे लागत आहे. त्यामुळे आधीपासूनच अस्तित्वात असलेले
गोपनीयतेचे मुद्दे अधिक तीव्र झाले आहेत.
घरून काम करत असलेल्या नोकरदारांचा इंटरनेटवरील उपक्रमाचा मागोवा घेतल्यानंतर ही निरीक्षणे समोर आली आहेत.
सतत ऑनलाईन राहिल्याने बाकीच्याही समस्या वाढल्या आहेत. अनेकांना ‘झूम’ थकवा जाणवल्याचे निदर्शनास आले.
लोकांची इतरांना भेटून त्यांच्याशी बोलण्याच्या, संवाद साधण्याच्या इच्छेत वाढ झाल्याचेही आढळून आले आहे.
महासाथीमध्ये अनेकजण ऑनलाईन खरेदीला महत्त्व देत असल्याने सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
मास्क, लस आणि इतर गरजेच्या वस्तूंच्या खरेदीत फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत.