CoronaVirus News: हो, बेड उपलब्ध आहे; पण तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 01:28 AM2020-06-14T01:28:41+5:302020-06-14T01:28:55+5:30
अनेकवार विनंती केल्यावर कुठे सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत नियंत्रण कक्षांकडून पुरेशी माहिती मिळाली. अन्य कक्षांतून मात्र समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.
मुंबई महापालिकेने कोरोनाबाधितांना विविध रुग्णालयात वेळेत खाट उपलब्ध व्हावी यासाठी विभागीय नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. या नियंत्रण कक्षात दूरध्वनी केल्यानंतर वेळेत खाट उपलब्ध होते का? नक्की काय प्रक्रिया आहे. मदत मिळते की नाही? याबाबतची वस्तुस्थिती तपासण्यासाठी लोकमत रिअॅलिटी चेक केले आणि याद्वारे बहुतांश विभागीय नियंत्रण कक्षातून प्रश्नांची सरबत्तीच करण्यात आली. अनेकवार विनंती केल्यावर कुठे सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत नियंत्रण कक्षांकडून पुरेशी माहिती मिळाली. अन्य कक्षांतून मात्र समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.
मुंबई : तुम्ही तुमची कोरोना टेस्ट केली का? तुमचा रिपोर्ट आला का? रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? नक्की फोन कशासाठी केला? माहिती घेण्यासाठी की चौकशी करण्यासाठी? तुम्ही तुमचा रिपोर्ट पाठवा. मग आम्ही डॉक्टरांना दाखवून लक्षणे पाहू. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करू; अशी प्रश्नांची सरबत्ती करत कोरोनाबाधितांना खाट उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून दूरध्वनीधारकाचे समाधान करण्याऐवजी शंका-कुशंका उपस्थित करण्यात आल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे खाटा उपलब्ध आहेत की नाहीत? ते चटकन समजत नाही. कारण डॅशबोर्ड तयार होतो आहे आणि तुम्ही तुमची तपासणी करून अहवाल आल्यानंतर फोन केल्यास अधिक माहिती मिळू शकेल. तुर्तास तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नसतील तर घाबरून जाण्याचे कारण नाही, असे म्हणत दिलासाही देण्यात आला.
कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या खाटा मिळवून देणे, ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी नागरी मदत सेवा क्रमांक १९१६द्वारे प्राथमिक व्यवस्थापन करण्यात येत होते. मात्र, आता कोरोना रुग्णांना तातडीने खाटा उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णालय खाटा व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणली असून त्यासाठी सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉररूम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले आहेत. विभागीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून तीव्र बाधा असलेल्या कोरोनाबाधितांंची वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुलभ व जलद होत आहे. रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही आता विभागीय कक्षाद्वारे होणार असल्याने रुग्णवाहिकांचा प्रतिसाद कालावधी वाढेल, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.
ए (फोर्ट) : दोन-तीन दिवसांपासून ताप येत आहे. चाचणी करण्याची गरज आहे का? असे विचारले असता, हेल्पलाइनवरील आॅपरेटरने आणखी कोणती लक्षणे आहेत? सर्दी-खोकला, कफ पडत असल्यास तोंडाला मास्क लावून घरातच क्वारंटाइन करण्याचा सल्ला दिला. तसेच डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन तात्काळ जवळच्या प्रयोगशाळा किंवा पालिकेच्या रुग्णालयात चाचणी करण्याचा सल्ला दिला. तिथे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्यास येथेच संपर्क करा, रुग्णालयात खाट उपलब्ध करून देण्यात येईल, याची हमी दिली. तसेच रुग्णाचे नाव, वय, राहण्याचे ठिकाण, दूरध्वनी क्रमांक घेण्यात आला.
बी (डोंगरी) : रुग्ण कोण आहे ? कोणत्या एरियात आहे, अशी माहिती सुरुवातीला डॉ. आकाश जाधव यांनी विचारली. डॅशबोर्डचे अनावरण आताच झाले असून लवकरच तो कार्यान्वित होणार असल्याने सध्या रुग्णाच्या माहितीवरून संबंधित हॉस्पिटलमध्ये कॉल करून माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
इ (भायखळा) : विकेंद्रित पद्धतीने बेड्सची उपलब्धता कळावी यासाठी वॉर्ड स्तरावर कंट्रोल रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तुम्ही कॉल केल्यानंतर रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असला तरच तुम्हाला बेड्सची माहिती उपलब्ध होत आहे. रुग्ण कोण आहे? रिपोर्ट काढला का? पॉझिटिव्ह आला आहे का? असे प्रश्न विचारले गेले आणि रिपोर्ट कुठे केला आहे ? या प्रश्नांची माहिती घेतल्याशिवाय बेड्सची किती उपलब्धता कुठे आहे हे सांगितले जात नाही.
एफ/नॉर्थ ( सायन) : पहिल्याच प्रयत्नात फोन उचलण्यात आला. समोरून आश्वासक संवाद होता. कोरोनासाठी बेड उपलब्ध असल्याबाबत विचारणा केली असता लक्षणे कोणती आहेत, याची विचारणा करण्यात आली. ताप आहे का, डोके दुखते आहे का, घसा आणि श्वास घेण्यास काही त्रास होतो का, याची चौकशी केली. मास्क लावून घरीच राहण्याचा सल्ला दिला. कोरोनाबाबतची काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडून तशी चिठ्ठी घेऊन तातडीने जवळच्या प्रयोगशाळा किंवा पालिकेच्या रुग्णालयात चाचणी करण्याचा सल्ला दिला. या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर याच नंबरवर फोन करा. लगेच हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. दरम्यान नाव, वय, पत्ता नोंदवून घेतला.
एफ/साऊथ (परळ) : मित्राचा घसा दुखत असून थकवाही आहे. त्याची तपासणी करावी आणि रुग्णालयात दाखल करावे म्हणून एफ साऊथच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. यावर, संबंधितांनी लक्षणांबाबत आणखी माहिती घेतली. त्यावरून प्रथम जवळच्या डॉक्टरांना भेटून तपासणी करण्याचा सल्ला दिला. कोरोनाची लक्षणे सांगून आवश्यक काळजी घेण्यास सांगितले. तुमच्या डॉक्टरांनी कोरोनाची शंका व्यक्त करून तपासणीचे प्रिस्क्रिप्शन दिल्यास जवळच्या पालिका रुग्णालयात किंवा प्रयोगशाळेत जाण्यास सांगितले. येथील चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याची माहिती सिस्टीममध्ये येते. त्यावर आम्हीच तुम्हाला फोन करू. तुम्हाला लगेच अॅडमिट करायची व्यवस्था करू, असे सांगण्यात आले. काळजी करू नका. उद्या आणखी गरज वाटली तर फोन करा, असेही सांगितले.
जी/नॉर्थ (दादर, धारावी) : नातेवाइकाला सर्दी, खोकला, ताप असल्याने आजच चाचणी केली आहे. चिंता वाटते पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर रुग्णालयात खाट मिळणार की नाही, काय करावे? या प्रश्नावर विभागातील हेल्पलाइनवर संबंधित रुग्णाच्या आजाराची लक्षणे व इतर आजार अशी सर्व माहिती घेण्यात आली. तसेच चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्यास महापालिकेकडे अहवाल येतो. त्यानुसार रुग्णाला संपर्क करण्यात येईलच. त्यामुळे काळजी करू नये, तरीही काही शंका असल्यास उद्या येथे संपर्क करा, पूर्ण मदत केली जाईल, असे सांगण्यात आले.
एच/इस्ट (वांद्रे पूर्व ) : नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून मित्राला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याची माहिती दिल्यावर नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्याने पूरक माहिती विचारून घेतली. नेमकी कोणती लक्षणे आहेत? आणखी काय काय होत आहे, हे सर्व विचारून घेतल्यानंतर त्वरित कोविड १९ची तपासणी करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यासाठी दोन खासगी प्रयोगशाळांशी संंपर्क करण्याचा सल्ला दिला. या प्रयोगशाळेत तपासणी केल्यास अहवाल लवकर मिळेल. महापालिकेद्वारे तपासणी केल्यावर अहवाल मिळण्यास फार विलंब होईल, असे सांगण्यात आले. तपासणीला किती खर्च येईल; त्याची माहिती प्रयोगशाळेतील कर्मचारी देतील असे सांगण्यात आले. संशयित रुग्ण गरीब असून आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने महापालिकेद्वारे विनामूल्य तपासणी करण्याची विनंती केली असता पैसे जमवून त्वरित तपासणी करा. अहवाल मिळवा अन्यथा रुग्णाच्या जीवाला धोका पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली. अहवाल आल्यानंतर खाट उपलब्ध करून देण्याचा शब्द देण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास खाट खासगी रुग्णालयात मिळेल की सरकारी रुग्णालयात मिळेल त्याची माहिती नंतर दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
एच/वेस्ट (वांद्रे प.) : रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खाट मिळण्याबाबत विचारणा केल्यावर वांद्रे पश्चिम येथील पंचतारांकित दोन रुग्णालयांमध्ये खाट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगण्यात आले. रुग्ण गरीब असल्याने महापालिका रुग्णालयात खाट उपलब्ध करून देण्याची विनंती केल्यावर महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये खाट उपलब्ध आहे का ते तपासून सांगतो, असे उत्तर मिळाले. रुग्णाचा अहवाल व पत्ता त्वरित पाठवा. त्यानंतर रुग्णाची स्थिती पाहून त्याला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करायचे किंवा रुग्णालयात दाखल करायचे याचा निर्णय आम्ही घेऊ. खासगी रुग्णालयातही पैसे देऊन व विनामूल्य खाट मिळू शकेल, असे सांगण्यात आले. रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तीला थेट कॉल करायला सांगा. अन्यथा तुमच्याकडे महापालिकेची टीम येईल, असा इशारा देण्यात आला.
के/इस्ट (अंधेरी पूर्व ) : आपण कुठून बोलता, आपल्याला काय मदत हवी आहे, अशी विचारणा करण्यात आली. या वॉररूममध्ये २ डॉक्टर व ५ शिक्षक काम करतात. तर या वॉररूममध्ये सुमारे २० लाइन्स जोडण्या आल्या असून कॉल लगेच घेतला जातो. आमच्याकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे त्यांना कॉल केला जातो. आमच्या प्रश्नावलीप्रमाणे त्यांना काय त्रास होतो, ताप कधीपासून येतो, दम लागतो का, लक्षणे काय याची माहिती कर्मचारी घेतात. त्यांना मार्गदर्शन करतात. रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची विनंती केल्यास आमच्या रुग्णवाहिका तैनात असतात. बेडच्या उपलब्धतेनुसार येथील होली स्पिरिट हॉस्पिटल, कुलकर्णी हॉस्पिटल, हशिर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल करण्यात येते. ५ दिवसांत सुमारे ३५० कॉल आम्ही अटेंड केले असून आमच्या वॉररूमचा मोठा फायदा कोरोना रुग्णांना मिळाला आहे, अशी माहिती या वॉर्डचे सहायक पालिका आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी दिली.
के/वेस्ट (अंधेरी पश्चिम ) : येथे १० लाइन्स कार्यान्वित असून कॉल घेणारे वेगवेगळे कर्मचारी असून आलेल्या कॉलची रजिस्टरला नोंद केली जाते. वॉररूमचे काम हे शिफ्टमध्ये चालते. रुग्णांच्या उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या घरी कॉल करून संपर्क करतात तसेच ज्यांना कोरोनाची लक्षणे वाटतात, वॉररूमची मदत-सल्ला हवा असल्यास असे नागरिकसुद्धा कॉल करतात त्यांच्या शंकांचे निराकरण करून त्यांना मदत केली जाते. आमच्याकडील यादीनुसार कोरोना रुग्ण व कुटुंबाची सविस्तर माहिती घेतली जाते. आमची एक टीम वॉररूमला तर दुसरी टीम फिल्डवर काम करते. फिल्डवरची टीम कोरोना रुग्णांच्या घरी जाऊन आमच्या रुग्णवाहिकेतून त्यांना बीकेसी, नेस्को येथील कोविड सेंटरमध्ये किंवा येथील बीएसईएस किंवा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते, अशी माहिती सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.
एल (कुर्ला) : कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत का? हे तपासण्यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता त्यांनी आपण आपली तपासणी केली का? रिपोर्ट आला का? असे प्रश्न विचारले. आपण तपासणी केली नाही. मात्र या क्रमांकावर खाटा उपलब्ध असण्याबाबत माहिती मिळते का? हे जाणून घेण्यासाठी फोन केला आहे हे सांगितले. तेव्हा त्यांनी शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मुळात आम्ही येथे प्रत्येकाला धीर देण्याचा प्रयत्न करतो. तपासणी केल्यावर रिपोर्ट आला का हे विचारतो. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांशी संवाद साधला जातो. लक्षणे तपासली जातात. लक्षणे कोणत्या स्तरावरील आहेत. हे तपासले जाते. त्यानुसार कार्यवाही केली जाते. सध्या एल वॉर्डमध्ये खाटा उपलब्ध नाहीत. मात्र अशा वेळी आम्ही इतर वॉर्डमध्ये खाटा देण्याचा प्रयत्न करतो. नायरसारख्या मोठ्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत का? हे तपासले जाते. येथे येणाऱ्या प्रत्येक कॉलला उत्तर दिले जाते. काही कॉल असेच माहिती घेण्यासाठी येतात. तेव्हाही येथे नक्की काय मदत मिळते, याची सविस्तर माहिती दिली जाते.
एम/ईस्ट ( देवनार) : कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती कशी आहे यावरूनच आम्ही खाट उपलब्ध करायची की नाही हे ठरवितो. जर कोरोनाबाधित रुग्णात अतिशय सौम्य लक्षणे असतील किंवा लक्षणेच नसतील आणि त्याच्या घरात सर्वांपासून वेगळे राहण्याची व्यवस्था असेल तर त्याला घरातच उपचार दिले जातात. जर कोरोनाबाधित रुग्णाची स्थिती अतिशय गंभीर असेल आणि त्याला लक्षणेही जाणवत असतील तर त्याच्यासाठी खाट उपलब्ध करून दिली जाईल. रुग्णास खासगी रुग्णालयात उपचार हवे असल्यास त्याच्या उपलब्धतेबाबतही माहिती देण्यात येईल. रुग्णास खाट एम पूर्व विभागातच मिळेल याची शाश्वती देता येणार नाही. यावेळी हेल्पलाइनवर फोन करणाºया त्याच्या आरोग्याची विचारपूस त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आली. तसेच तो कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आला असल्यास घाबरून न जाता चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले. फोन करणाºयाचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक लिहून घेण्यात आला.
एम/वेस्ट (चेंबूर) : विभागात पालिकेच्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत. तसेच खासगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पण कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर नियंत्रण कक्षाशी संपर्क केल्यानंतर एम पश्चिम वॉर्ड चेंबूर, लालडोंगर, माहुलगाव आदी ठिकाणच्या डिस्पेन्सरीमध्ये स्क्रिनिंगसाठी पाठवले जाते. त्यांनी सांगितले तरच पुढे कोरोना चाचणीसाठी पालिका रुग्णालयात पाठविण्यात येते. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नियंत्रण कक्षाकडून रुग्णासाठी खाटा उपलब्ध करून देण्यात येतात. दरम्यान, सध्या चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, तसेच खासगी रुग्णालयाच्या खाटाही ताब्यात आहेत.
पी/नॉर्थ (मालाड) : माझ्या मावशीला कोरोनासदृश लक्षणे आहेत, असे सांगितल्यानंतर नियंत्रण कक्षातील प्रतिनिधीने रुग्णाचे नाव आणि पत्ता घेत डॉ. सुरेंद्र गुप्ता यांना फोन दिला. त्यांनीही रुग्णाची संपूर्ण माहिती घेत कोरोना चाचणी केलीय का? असे विचारले. मात्र प्रतिनिधीने नाही असे सांगत रुग्णाचा व्हॉट्सअॅप क्रमांक आणि त्यावर सर्व रिपोर्ट पाठवून देते असे सांगून बेड उपलब्ध आहेत का? कोणत्या रुग्णालयात मिळतील? अशी विचारणा केली. त्यावर बेड उपलब्ध आहेत. मात्र नेमके कोणत्या रुग्णालयात मिळेल हे वरिष्ठांशी बोलून कळवतो. तोपर्यंत तुम्ही रुग्णाचे रिपोर्ट व्हॉट्सअॅपवर पाठवा, असे उत्तर डॉ. गुप्ता यांनी दिले.
पी/साऊथ (गोरेगाव) : नातेवाइकाला कोरोनासदृश लक्षणे असून तिला रुग्णालयात दाखल करण्याचे फॅमिली डॉक्टरने सांगितल्याचे फोन उचलणाऱ्या प्रतिनिधीला सांगितल्यानंतर तिने रुग्णाची सर्व माहिती घेत पत्ता विचारला. मात्र प्रतिनिधीने मुद्दामहून कांदिवलीचा पत्ता तिला दिला तेव्हा ‘तुम्ही आधी कोरोना चाचणी करून घ्या. टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच आम्ही तुमच्या पेशंटला दाखल करून घेऊ’ असे उत्तर देण्यात आले. टेस्ट कुठे करू विचारल्यावर जनरल रुग्णालयात जाऊन करून घ्या, असे सांगण्यात आले. प्रतिनिधीने गयावया करण्यास सुरुवात केली तेव्हा अबोली पगारे नामक तरुणीने फोन घेत पुन्हा रुग्णाची लक्षणे विचारली आणि लक्षणांवरून कोरोनाचा इश्यू वाटत नाही, असे उत्तर दिले. तेव्हा तुम्ही फोनवरच निदान करता का? असे प्रतिनिधीने विचारले. त्यावर तसे नाही ते टेस्ट केल्यावरच समजणार, असे म्हणत रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतोय का? असा प्रश्न विचारला. मी रुग्णाचे रिपोर्ट पाठवते आपला व्हॉट्सअॅप क्रमांक द्या, अशी विनंती प्रतिनिधीने केली. मात्र पगारे यांनी प्रतिनिधीचा मोबाइल क्रमांक घेत आमच्या मॅडमशी बोलून तुम्हाला कळवते, असे उत्तर देत फोन ठेवला.
आर/साऊथ (कांदिवली) : रुग्णाची चाचणी केली असून रिपोर्ट उद्या येणार आहे. लक्षणे कोरोनाचीच आहेत. पालिकेकडे किंवा खासगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती मिळेल का? असा प्रश्न केला असता हेल्पलाइनवरील आॅपरेटरने रुग्णाला असलेली लक्षणे, वय, पत्ता इत्यादी माहिती विचारली. दररोज काही रुग्णांना डिस्चार्ज मिळत असल्याने व दररोज नवीन रुग्ण भरती होत असल्याने खाटांची संख्या कमी-जास्त होते. खाटा उपलब्ध नसतील तर थांबावे लागेल. रुग्ण गंभीर असेल तर त्याला नायर, केईएम रुग्णालयात दाखल करण्यात येईल. लक्षणे थोडी सौम्य असतील तर याच परिसरातील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेऊ. रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर संपर्क करा. आवश्यकता भासल्यास रुग्णवाहिका पाठवू, अशी हमी या हेल्पलाइन आॅपरेटरने दिली.
आर/सेंट्रल (बोरीवली) : रुग्णाची चाचणी केली असून अहवाल उद्या येईल. आपल्या विभागात रुग्णासाठी खाट उपलब्ध आहे का? असा प्रश्न आर मध्य हेल्पलाइन आॅपरेटरला केला. खाटांची माहिती आता देऊ शकत नाही. रुग्ण कुठे राहतो, याची माहिती घेतल्यावर त्यांनी बोरीवलीत पालिकेची भगवती आणि शताब्दी अशी दोन रुग्णालये असल्याने रुग्णाला तातडीने खाट तातडीने उपलब्ध होईल की नाही, हे आताच सांगू शकत नाही, असे सांगितले. सकाळी रुग्णालयात गेलेल्या रुग्णाला अद्याप खाट उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे तुमच्या रुग्णाला खाट मिळविण्यासाठी दोन-तीन दिवस जातील. खासगी रुग्णालयात लगेच दाखल केले जाईल आणि पालिकेच्या रुग्णालयात दाखल करायचे असल्यास अर्ज भरावा लागेल, अशी माहिती येथे मिळाली. या प्रभागातील रुग्णाला याच प्रभागात खाट मिळेल का, असा प्रश्न केला असता त्यांनी खाटा ज्या प्रभागात उपलब्ध असतील तिथे रुग्णाला पाठवण्यात येईल, अशी माहिती दिली.
एस (भांडुप) : रात्री सात कॉल केल्यानंतर येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क झाला. महिला कर्मचाºयाने, आधी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला कॉल करा. आम्ही तुम्हाला डॉक्टरचा मोबाइल क्रमांक देऊ. त्यानुसार संबंधित रिपोर्ट त्यांना व्हॉट्सअप करताच त्याची खातरजमा करून, तुम्हाला कुठे जागा आहे याबाबत माहिती देऊ असे सांगितले. वेळेवर जागा उपलब्ध नाही झाली तर? असे विचारताच, ‘नाही मॅडम, तसे होणार नाही. तुम्ही घाबरू नका. कारण आता कोण कुठे डिस्चार्ज होणार याबाबत लगेच सांगू शकत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह आल्यानंतर माहिती घेऊन, तुम्हाला सांगू’, असे नमूद केले.
टी (मुलुंड) : कोविड तपासणी केली का? नसेल तर अग्रवाल रुग्णालयात चाचणी करा, असा सल्ला येथे दिला. चाचणीनंतर दोन दिवसात अहवाल प्राप्त होईल. तो पॉझिटिव्ह असेल तर आम्ही समोरून कॉल करून कुठे जागा आहे, याबाबत माहिती देऊ असे नमूद केले.