Join us

coronavirus: कोरोनामुळे मुंबईवर आले खड्ड्यांचे संकट, अधिकारी मुंबईकरांचे आरोग्य जपण्यात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 2:28 AM

मुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात संपूर्ण महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याने अन्य विकासकामे दुर्लक्षित राहिली. पहिल्याच पावसात सखल भागात ...

मुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात संपूर्ण महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याने अन्य विकासकामे दुर्लक्षित राहिली. पहिल्याच पावसात सखल भागात पाणी भरले. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेला पुरेसा अवधी न मिळाल्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांची वाट बिकट होण्याची शक्यता आहे.दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागतो. तसेच खड्ड्यांमुळे काही अपघातही घडले आहेत. मात्र अनेक उपाययोजना करूनही मुंबईला खड्डेमुक्त करण्यात महापालिकेला यश आलेले नाही. गेल्या वर्षी ‘खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा’ अशी बक्षीस योजना पालिका प्रशासनाने आणली होती. त्यावेळेस नागरिकांनी खड्ड्यांचे फोटो काढून पालिकेच्या अ‍ॅपवर पाठवले होते. नियमानुसार २४ तासांच्या आत न बुजवलेल्या खड्ड्यांसाठी संबंधित तक्रारदारांना पाचशे रुपये बक्षीस देण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती.आॅक्टोबर महिन्यापासून मुंबईतील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली होती. मात्र मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले. तसेच पालिकेची सर्व यंत्रणा, कर्मचारी, अधिकारी कोरोनाविरुद्ध लढ्यात व्यस्त झाले. याचा फटका पावसाळापूर्व कामांना बसला. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेने ही सर्व कामे घाईघाईने आटोपली. मात्र दरवर्षी पावसाळ्यापूर्वी होणारी रस्त्यांची डागडुजी करण्यास अवधी न मिळाल्यामुळे त्याचे परिणाम यंदाच्या पावसाळ्यात दिसून येतील, अशी भीती एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.१५८ रस्त्यांवर खड्डे पडतातच‘खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा’ या योजनेला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. १ ते ७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सुमारे १७०० खड्ड्यांच्या तक्रारी पालिकेकडे आल्या.मुंबईतील तब्बल १५८ रस्त्यांवर कायम खड्डे पडतात, असे एका अभ्यासातून पालिकेला आढळून आले होते. या रस्त्यांचा अभ्यास करून तज्ज्ञांमार्फत कृती आराखडा तयार करण्यात येणार होता.रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो काढून काही नागरिक मायबीएमसी पॉटहोलफिक्स साइटवर पाठवीत आहेत. यामध्ये महापालिका विभाग कार्यालय, रस्ते विभाग तसेच अन्य प्राधिकरणाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईरस्ते वाहतूकखड्डे