CoronaVirus : कोरोनामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदली लांबणीवर
By जमीर काझी | Published: April 3, 2020 11:23 AM2020-04-03T11:23:22+5:302020-04-03T11:51:36+5:30
CoronaVirus : कोरोनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे .त्यामुळे त्याच्या नियंत्रणावर प्राधान्य दिले जाणार असून परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल ,असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
- जमीर काझी
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावाचा फटका भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यावर पडला आहे. त्यासाठीचा त्यांचा यंदाचा एप्रिलचा 'मुहूर्त" हुकला असून प्रतिक्षा करावी लागणार आहे. कोरोनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे .त्यामुळे त्याच्या नियंत्रणावर प्राधान्य दिले जाणार असून परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल ,असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
एक डीजी, तिघा एडीजीसह सुमारे १२वर आयपीएस अधिकाऱ्यांचे प्रमोशन निश्चित आहेत. तर पुणे,ठाणे, नागपूर,एसआएडी आयुक्तासह ३०वर अधिकाऱ्यांच्या बदल्या निश्चित असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. आयपीएस अधिकाऱ्यांचे प्रमोशन व बदलीकडे पोलीस वर्तुळासह विशिष्ट घटक आणि सामान्यांचेही लक्ष लागून राहिलेले असते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आयपीएसच्या बदल्याचे हे पहिलेच गॅझेट असणार आहे .त्यामुळे इच्छुक पोस्टिंगसाठी अधिकाऱ्यांकडून नव्या राजकर्त्याशी पूरक व अनुकूल भूमिका घेतली जात होती .साधारण मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या मध्यापर्यत बदल्या करण्याचे पहिल्यांदा गृह विभागाचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या भीषण संकटामुळे या सर्वावर पाणी फिरले आहे.
सध्या रिक्त असलेले महासंचालकाचे एक आणि अप्पर महासंचालकांच्या तीन जागावर पदोन्नतीसाठी निवड समितीची बेठक मार्चच्या पहिल्या आठवड्यात झाली तर उर्वरित पदासाठी अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर पदोन्नती व बदली समितीची बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या भीषण संकटामुळे अधिवेशनचा कालावधी रद्द करण्यात आला. प्रशासनाने या विषाणूला लगाम घालण्याला प्राधान्य दिल्याने अन्य सर्व विषय बाजूला पडले आहेत. त्यामुळे बदली-बढतीचा सध्या विचार केला जाणार नसल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
कोरोनाची दाहकता वाढत राहिल्याने हा विषय बाजूला पडला आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांचा एका पदावर दोन वर्षाचा कालावधी पुर्ण होवून बदलीसाठी पात्र ठरलेत, त्यांना काहीकाळ त्याच पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
'महाविकास'च्या पहिल्या आयपीएस गँझेटला मुहूर्त मिळेना
राज्यात चार महिन्यापुर्वी अनपेक्षितपणे सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर भाजपाच्या विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आणि मोक्याच्या जागी असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना तातडीने बदलले जाईल,अशी चर्चा सुरू होती.मात्र या सरकारने घाई न करता योग्यवेळी निर्णय घेण्याचे ठरविले होते. त्यामुळे संजय बर्वे निवृत्त झाल्याने मुंबईचे आयुक्त पद वगळता अन्य कोणत्याच महत्वाच्या पदावर बदल केलेला नाही. कोरोनाच्या संकटामुळे हा मुहुर्त आणखी लांबणीवर पडला आहे.
अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्याही लांबणीवर
आयपीएस प्रमाणेच मपोसे अधीक्षक ते उपनिरीक्षक पदापर्यंतच्या बदल्या यावर्षी लांबणीवर पडणार आहेत .कोरोनाची भयावहता नियंत्रणात न आल्यास कदाचित यंदा वार्षिक बदल्या केल्या जाणार नाहीत ,तसेच अंमलदाराच्या बदल्या स्थानिक घटकाप्रमुखाकडून केल्या जाणाऱ्या अंमलदाराच्या बदल्या रद्द केल्या जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली.